Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Saturday, 26 February 2022

‘...आवलीसारखी धरती होती, म्हणून...'

 

'नाट्य समीक्षण' : 60 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा २०२२ 

नाटक - तुक्याची आवली  
परमेश्वराचा स्पर्श झाला तरीही ‘माणूस’ बनून उदात्त जगता यायला हवं असं निखळ तत्वज्ञान नावातच ओसंडून वाहणार्या संत तुकोबांची कथा आणि गाथा सगळ्यांनाच माहितीय. पण त्यांना जन्मभर साथ देणाऱ्या आवलीबद्दल कोणालाच काहीच माहित नसावं, ही आजवरची शोकांतिकाच ठरते. तुकोबा वैकुंठाला गेले त्यानंतर आवलीचं काय झालं? याबद्दलही कुठे फारसं काही नमूद नाही. ‘60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धांच्या’ निमित्ताने अहमदनगरच्या माउली सभागृहात सादर झालेल्या ‘तुक्याची आवली’ या नाटकाने हीच गोष्ट अधोरेखित केलीय..

-----------------------------------------------------------------

‘तुम्ही नेहमी सुखीच रहाल..’ अशा कोणत्याच करारावर नियतीने सही केली नाहीय ! म्हणून ती तुम्हाला सतत छळत राहते. या पलीकडे नियतीशिवाय कोणीतरी असावं, कदाचित परमेश्वरच ! ही धारणा अलीकडच्या काळात फार कमी होत चाललीय. त्यामुळे तुमच्या-आमच्या जगण्यात अनपेक्षितपणाने काहीतरी घडलंच तर दोष किंवा शिव्या द्यायलाही तितकं हक्कांचं कोणी नाहीय.. हेही ठीक. परंतु वेळ पडलीच तर तुमच्यासाठी या अदृश्य शक्तीलाही शिव्या शाप देणारी एखादी व्यक्ती सोबतीला असावी..तेव्हाच असा एखादा संवाद जन्म घेतो – ‘आधाराला आवलीसारखी धरती होती, म्हणून तुका आकाशाएवढा झाला..’ 

परमेश्वराचा स्पर्श झाला तरीही ‘माणूस’ बनून उदात्त जगता यायला हवं असं निखळ तत्वज्ञान नावातच ओसंडून वाहणार्या संत तुकोबांची कथा आणि गाथा सगळ्यांनाच माहितीय. पण त्यांना जन्मभर साथ देणाऱ्या आवलीबद्दल कोणालाच काहीच माहित नसावं, ही आजवरची शोकांतिकाच ठरते. तुकोबा वैकुंठाला गेले त्यानंतर आवलीचं काय झालं? याबद्दलही कुठे फारसं काही नमूद नाही. ‘60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धांच्या’ निमित्ताने अहमदनगरच्या माउली सभागृहात सादर झालेल्या ‘तुक्याची आवली’ या नाटकाने हीच गोष्ट अधोरेखित केलीय..

यापूर्वी जेव्हा कधी आवली बद्दल कानावर पडलं असेल तेव्हा विठ्ठलाला काळ्या म्हणून हाक मारणारी, त्याचा सतत राग करणारी, त्याला शिव्या शाप देणारी तोंडाने फटकळ असलेली अशीच आवली समोर आली. पण भोळ्या तुकारामावर जन्मभर निस्सीम प्रेम करणारी, आपला कोणताच कसूर नसतानाही वाट्याला आलेल्या दुबळ्या लाचार जगण्याचा स्वीकार करून संकटांशी सामना करणारी..अनेकदा बायको म्हणून हतबल असूनही ‘माय’ असलेली बेडरपणे आयुष्याला सामोरं जाणारी आवली या नाटकातून पहिल्यांदाच पाहायला मिळाली.

नाटकाच्या सुरुवातीला अगदी काही मोजक्या दृशांतून आवलीचं बालपण दाखवलंय. त्यानंतर तिचं तुकोबाशी झालेलं लग्न आणि नंतर आयुष्यभर तिने अनुभवलेली फरपट या नाटकातून प्रचंड ताकदीने सादर केलीय. कधीही न पाहिलेली, ऐकलेली आवली साकारणं सोपं नव्हतंच. ते जितकं महत्वाचं तितकंच जबाबदारीचंही होतं. म्हणून केवळ आवलीच्या प्रतीक्षेत तब्बल चार वर्षे या संहितेने प्रवास केला आणि शेवटी आश्विनी अंचवले या तरुणीने ही भूमिका यशस्वी पार पाडली. कधीही न विसरणारी आवली रसिकांसमोर उभी केली..जागवली..नव्हे पुन्हा संत तुकोबांचा तो काळ समोर उभा केला. तुकोबा साकारणारे संकेत शहा देखील असेच शांत, संयमी आणि सरळ स्वभाव असलेला कलाकार. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट जाणवत नसले तरी, त्यांची अभंग गायणाची पद्धत, विठ्ठल भेटीसाठी होत असेलेली व्याकुळता..आवलीच्या प्रत्येक प्रश्नावर फक्त ‘पांडुरंग’ म्हणून ठरलेलं उत्तर....असे तुकोबा साकारताना संकेत यांनी या पात्रात जीव ओतूल्याचं दिसून येतं. याशिवाय भाग्यश्री आंधळे आणि सौमित्र लोळगे यांनी तुकोबांच्या लेकरांच्या भूमिका लिलया साकारल्या. याबरोबरच पंढरीनाथ या व्यक्तिरेखेतून क्षितीज कंठाली यांनी कमीत कमी वेळेत ‘पांडुरंगाचं’ दर्शन घडवलंय..

सहकलाकार म्हणून इतर व्यक्तिरेखेत मृणाल कुलकर्णी, प्रतीक्षा वेळापुरे, अनुष्का क्षीरसागर, सचिन शिंगटे, किरण गानबोटे, पल्लवी दिवटे, शुभम निर्मळ, चैताली बडे, युक्त ठुबे, विनोद गरुड, गौरव ठिपसे, माहीर कुलकर्णी, वैभव तागड, साई चासकर या पात्रांनीही काहीच कसूर ठेवला नाही.

  • नाटक - तुक्याची आवली (महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा,२०२२) 

       नाटक सुरु होतं, पुढे पुढे सरकत जातं...आवलीचं ‘पांडुरंगावर’ रागावणं जितकं मिश्कीलपणानं हशा आणि टाळ्या घेवून जातं तितकंच तिचं तिचं तुकोबावर असलेलं निखळ प्रेम रसिकांना भावूक सुद्धा करतं. नियतीने दिलेले पांग कोणाला चुकलेत का ? असा स्वत:लाच सवाल करत जगणारी आवली वारंवार आपल्याला खिन्न करते. भरल्या घरात सारी सुखं, ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असताना ऐनवेळी पडलेला दुष्काळ, त्यातून झालेली वाताहत, माणसं जागविण्यासाठी घरातलं होतं नव्हतं सगळं जगाला वाटून रिकामा झालेला तुकोबा..त्याला सावरू पाहणारी त्याची सहचारिणी आवली, त्याची तान्हेली लेकरं, दम्याच्या त्रासाला वैतागून अंथरुणाला खिळून पडलेली नंतर तशीच मरून गेलेली तुकोबाची पहिली बायको..अशा कित्येक गोष्टी प्रत्यक्षात, चित्र रूपाने न दाखवताही त्यांना मूर्त रूप देवून दिग्दर्शक संजय लोळगे यांनी या नाटकाची उंची गाठलीय. नाट्य-लेखक गिरीश जुन्नरे यांनी केवळ आवलीच्या पात्राला समोर ठेवून लिहिलेली संहिता आणि त्यातले भिडणारे संवाद नाटक संपल्यानंतरही रसिकांच्या मनात रेंगाळत राहतात. नाटकाच्या उत्तरार्धात अगदी शेवटच्या दृश्यात दाखवलेली ‘तुकोबा-आवलीची’ पांडुरंगाशी होणारी भेट संपूर्ण नाटक पाहून खिन्न झालेल्या रसिक मनाला चैतन्य देवून जाते....

सुदर्शन कुलकर्णी यांनी दिलेलं उत्तम संगीत, भाग्यश्री आंधळे यांची प्रकाश योजना, नाना मोरे यांची रंगमंच व्यवस्था, युक्त ठुबे यांची वेशभूषा.. या नाटकाच्या अत्यंत जमेची बाजू आहेत. या सगळ्या बाबी महत्वाच्या असल्या तरी काकणभर का होईना चैताली बर्डे यांनी साकारलेल्या सुंदर नेपथ्य कलेसाठी विशेष दाद द्यावी वाटते.
एकूणच असं वाटतं की, या नाटकाचे प्रयोग खेडोपाडी, सांप्रदायिक वाटेवर होत राहोत ..तुकोबा इतकंच आवलीचं जीवनही सर्वाना उमगत जावो या असं वाटतं..!

  •           कृष्णा बेलगांवकर, ९८६०६७०१०६ 

Wednesday, 14 April 2021

चिखलात हुंदक्याच्या माणूस शोधतो मी....

 

काल दुपारचीच गोष्ट, तहसील कार्यालयासमोर दोन तरुणांना रस्त्यावर थुंकताना पाहून एका पोलिसाने चांगलंच फटकारलं आणि त्यांनी सॉरी बोलून तोंडावर मास्क चढवताच तो पोलीस तोंडात भरलेल्या माव्याची पिचकारी मारून गाडीवर निघून गेला. अशीच गोष्ट गेल्या काही दिवसांपूर्वीची- एका वृत्त वाहिनीला मत व्यक्त करताना एक मंत्री महोदय बोलले ‘मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा’ पण हे सांगताना ते स्वत: मात्र विना मास्कचेच वावरत होते.,आणि आश्चर्य म्हणजे त्यांना एकाही पत्रकाराने याबाबत विचारणा केली नाही, कारण त्या सगळ्यांनी तोंडावर ‘मास्क’ बांधले होते. कमाल असते ना? या आणि अशा काही घटनांमुळे ‘भारत म्हणजे जगाच्या नकाशावर स्वत:चं विडंबन करणारं एकमेव राष्ट्र बनत आहे’ असं खेदाने वाटू लागतं. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    साउथ कोरियात राहणाऱ्या एका संशोधक मित्राशी काल बोलत होतो. तिथली परिस्थिती अगदी नॉर्मल आहे. विशेष करून सगळे नागरिक स्वतःहून काळजी घेतायत आणि प्रशासनसुद्धा कोणतंही राजकारण न करता, न घाबरवता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहे. हीच परिस्थिती युरोपमधे असलेल्या मित्रानेही सांगितली, कालच. त्या दोघांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं जितकं स्पष्ट केलं तितकेच त्यामागची कारणं देखील स्पष्ट केली. संचारबंदी वगैरे असं काही लागू नाही केलं गेलेलं. पण लोक स्वत:हून निर्बंध लावून घेतायत. कामाशिवाय बाहेर पडत नाहीत. काही दिवस गरजा कमी केल्यात. जीवनावश्यक गोष्टींच प्राधान्याने घेतल्या जातायत अर्थात बाकीच्या गोष्टी त्यांनी स्वत:हून काही काळ थांबवल्या आहेत. नागरिकांप्रमाणेच तेथील राजकारण्यांनीदेखील हेच केलं आहे. गेले कित्येक दिवस त्यांनी एकही राजकीय सभा घेतली नाहीय. मला हे दोन्ही देश खूप आदर्श वाटतात पण याच वेळी माझ्या देशातली परिस्थिती पाहून अस्वस्थ वाटतं. माझ्याही देशातल्या नागरिकांना हेच हवं आहे ना? मग इथे का होत नाहीय असं? याची करणे आपण जाणताच. वर सांगितलेल्या दोन उदाहरणांच्या अगदी उलट परिस्थिती आपल्याकडे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना संचारबंदी हवी कि नको? या बाबत विचार मंथन करण्याइतका मी एकटा सक्षम नाही. पण तरीही प्रत्येकाने स्वत:वर काही दिवसांकरिता काही निर्बंध लावून घेतले तर? (तेही फक्त प्राथमिक गरजा सोडून इतर गोष्टींसाठी) काय हरकत आहे?  आणि खरं आहे, हरकत नाहीच. कित्येक लोकांनी हे केलं सुद्धा. नगरच्या झोपडी कॅन्टीन परिसरात एका कापड दुकाना समोर बोर्ड वाचण्यात आला – ‘ कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आम्ही सेल्फ लॉकडाऊन जाहीर करत आमचं दालन बंद ठेवत आहोत.’ याशिवाय शहरातील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी गरज ओळखून हवे ते बदल केलेत. राज्यात इतर ठिकाणीही असं घडलंय. माणसं जागृत आहेत, ती प्रशासनाला सहकार्य देखील करतायत. म्हणून मला साउथ कोरिया आणि युरोप इतकंच मला माझ्या शहरातलं ‘हे’ दालन देखील कौतुकास्पद वाटतं. मात्र या गोष्टींची दखल ना इथल्या प्रशासनाने घेतली ना कोणत्या माध्यमांनी. याउलट एक घडलं एकीकडे कोरोनाचा कहर झाल्याच्या बातम्या कानावर येत असतानाही दुसरीकडे माझ्या देशात, राज्यातही ठिकठिकाणी राजकीय सभांचं आयोजन केलं गेलं. योगायोगाने त्या सभेत एकही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. कारण आपले पत्रकार राजकारण्यांच्या सोयीने बातम्या देतात. मग सभेसाठी इतकी गर्दी उसळत असताना देखील एकालाही संसर्ग होत नसेल तर या राज्यात संचारबंदीची गरजच काय? हा सामान्य जनतेचा सवाल अगदी महत्वाचा वाटतो.

            दुसरीकडे सामान्य (?) लोक (ठराविक पण मोठ्या संख्येने) स्वत:हून कार्यकर्ते म्हणवत सभांना गर्दी करतायत त्यामुळे यात राजकारण्यांना एकांगी दोष देताच येणार नाही. हिच गोष्ट प्रसारमाध्यमांच्या बाबतीत देखील आहे. माध्यमे भीतीचं मार्केटींग करतायत, अशी ओरड करणारी निम्म्याहून अधिक जनता फेसबुक आणि WHATSAP वर त्याच गोष्टी एक्साईट होत वाऱ्याच्या वेगाने शेअर करतायत. अशा जनतेचे आपणही घटक असू तर या माध्यमांना आणि या नेत्यांना आपण दोष कसे देवू शकतो ?

            एक मात्र खरं की, गेल्या काही महिन्यात कोविड रुग्णांच्या नोंदी, त्यांचे अहवाल आणि बरे झालेल्यांची संख्या याबाबत निश्चित माहिती न दिल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी मात्र प्रशासन आणि माध्यमे दोन्हीही जबाबदार आणि दोषी आहेत. परवा रुग्णसंखेच्या धक्कादायक आकडेवारीची बातमी सांगताना एका खासगी वृत्त वाहिनीने हेडलाईन मध्ये ‘अहमदाबाद’ आणि मेन स्क्रीनवर ‘अहमदनगर’ असा उल्लेख केला. मग हेडलाईन सारखाच रुग्ण संख्येचा आकडाही चुकला नसेल हे कशावरून? हीच करणे आहेत संभ्रम निर्माण होणाची. आजच्या घडीला बातम्या पाहून देखील लोक घाबरत नसतील तर ‘लांडगा आला रे आला’ अशी परिस्थिती झाल्यासारखं वाटू लागतं. ‘नक्की काय खरं आणि काय खोटं? हे अजूनही स्पष्ट समजत नाही’ हा सामान्यांचा संवाद रोज कुठे ना कुठे कानावर पडतो.

            आता दोष कुणाचा ? हा सवाल विचारला तर काय उत्तर मिळेल ? उदाहरण सांगतो - काल दुपारचीच गोष्ट, तहसील कार्यालयासमोर दोन तरुणांना रस्त्यावर थुंकताना पाहून एका पोलिसाने चांगलंच फटकारलं आणि त्यांनी सॉरी बोलून तोंडावर मास्क चढवताच तो पोलीस तोंडात भरलेल्या माव्याची पिचकारी मारून गाडीवर निघून गेला. अशीच गोष्ट गेल्या काही दिवसांपूर्वीची- एका वृत्त वाहिनीला मत व्यक्त करताना एक मंत्री महोदय बोलले ‘मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा’ पण हे सांगताना ते स्वत: मात्र विना मास्कचेच वावरत होते.,आणि आश्चर्य म्हणजे त्यांना एकाही पत्रकाराने याबाबत विचारणा केली नाही, कारण त्या सगळ्यांनी तोंडावर ‘मास्क’ बांधले होते. कमाल असते ना? या आणि अशा काही घटनांमुळे ‘भारत म्हणजे जगाच्या नकाशावर स्वत:चं विडंबन करणारं एकमेव राष्ट्र बनत आहे’ असं खेदाने वाटू लागतं.’

            तसं पाहिलं तर प्रशासन देखील सगळीकडून अडचणीत सापडलं आहे, असंही वाटू लागतं. हे नियंत्रणात आणण्याचं आव्हान सोपं नाहीच. संचार बंदी करावी तर जनतेचा आक्रोश, तोही चुकीचा नाहीच. पण न करावी तर ‘काही’ (ठराविकच) लोक नियमबाह्य जगतात. खरे तर अशा ‘काही’ लोकांमुळेच हा देश कायमचा ‘कामाला’ लागला आहे. विशेषत: राजकारणात आलेल्या कार्यकर्त्यांमुळे. अरे बाबांनो, तुम्ही कार्यकर्ते व्हा, राजकारण करा, पण ही ती वेळ नाहीय हे का लक्ष्यात येत नाहीय तुमच्या? हा प्रश्न तुमच्यासह तुमच्या कुटुंबाच्या जगण्या मरण्याचा आहे, हे डोक्यात का जात नाही? नेते बदलतात, पक्ष बदलतात, मग त्यांच्यासाठी तुम्ही का एकमेकांशी वैर पत्करता? तेही अशा काळात? मित्रहो, हा क्षण फार बिकट आहे, माणसाला एक एक हात मोलाचा वाटतो आहे. ओळखी-अनोळखी कोणीही कोणासाठी देवदूत बनून उभा दिसतोय...अडचणीत असलेला जीव आकांताने हाक देतोय, त्याचा कानोसा घेण्याची गरज आहे. थोडे दिवस, मग पुन्हा तुम्ही तुमच्या प्रांतात विराजमान व्हा...भरपूर यश मिळवा. पण त्यासाठी चालत्या काळात एकमेकांचा आशीर्वाद घ्या. मला माहीत नाही कितपत खरं ते, पण देव म्हणवणारे डॉक्टर देखील पैशांमुळे बदनाम झाले, अर्थात यालाही अपवाद आहेतच. पण मेडिसिन साठी काळा बाजार होऊ शकतो या दुनितेत, ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी मात्र ते कामी येत नाही. कोट्यावधी संपत्ती असलेला पुण्यातला एक सहकारी अचानक सोडून गेला. त्याच्या घरातले व्याकूळ होवून बोलले ‘पाहिजे ती रक्कम दिली असती, पण....’ त्या पण पुढे ‘पुण्याई’ ची कमी होती. कदाचित असंच काही असेन. निसर्ग काहीतरी जुळवाजुळव करतोय. त्याला हिशेब लागत नसावा...किती प्राणी, किती कुत्रे, हत्ती, मांजरं किती किटक बनवले होते त्याने? माणूस सुद्धा त्याचीच निर्मिती पण आज त्याचीही अशी अवस्था? का? इतका साधा सवाल स्वत:ला विचारू नये का? नैतिक – अनैतिकतेच्या मर्यादा ओलांडून माणूस नावाचा प्राणी पशुत्वाकडे चालू लागलाय म्हणून तर नसेन होत हा विध्वंस? तसं असेल तरीही अचानक, लगेचच नाही होत हे., त्याने सूचना दिलीय. बदलाचे संकेतही दिले..पण आपण त्याची नोंदच घेतली नाही. तांत्रिक बदलाच्या तंद्रीत बिन्दास्त, स्वतंत्र म्हणता म्हणता खूप स्वैर होत गेलो आपण... ‘त्या’ने मात्र याची नोंद घेतलीय. म्हणून हा पसारा हादरलाय. वादळाची चाहूल लागल्यावर वारुळात लपलेले प्राणीही वाट मिळेल तिकडे धावू लागतात, तसच झालं ना? पायाखलची जमीन हादरली आणि एकाएकी माणसाचा कचरा झाला. सगळ काही प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकून देताना कचर्यासारखीच अवस्था होत नसेन का ?  पण या टोकाला पोहोचल्या माणसाला अजुनही का जाग येत नाही? कुठल्याची क्षणी श्वास बंद होण्याची चिन्हे दिसत असतानाही एकमेकांबद्दलचे द्वेष जराही कमी होत नसतील तर हा मानवतेचा करूण पराभवच नाही का? - सुधरा...निसर्ग एवढंच सांगू पाहतोय असं वारंवार वाटतंय.

            हा शब्द प्रपंच कोणाला चुकीचाही वाटू शकतो. तो बरा वाटावा, खरा वाटावा असाची माझा अट्टहास नाहीच. पण जे वाटलं ते व्यक्त केलं. पुन्हा एकदा आवाहन करतो, अवती भवती बरंच काही चांगलं देखील घडत आहे. हजारोंनी रुग्ण बरे होवून दररोज सुखरूप घरी जातायत. त्याचीही माहिती इतरांना देत रहा. कोणाचंही ‘मनोबल’ वाढवणं हेच मोठं औषध आहे असं समजा...होता होईल तितकं नकारात्मक बाजूला ठेवा. WHAT SAP वर आलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला फॉरवर्ड केलीच पाहिजे का? का हा वेडेपणा करताय रोज? तुम्हाला काहीच वाटत नसेल, पण कोणीतरी श्वासाची घालमेल मोजत बेडवर पडून असेन त्याच्या नातेवाईकाचा विचार करा. परवा एका मित्राला म्हणालो हे असं भडक काही शेअर करू नकोस. तर त्याचं उत्तर आलं - डोळे बंद केल्याने वास्तव बदलणार का ? ठिक, नसेन बदलणार ते, घडलेलं सगळच आता मोबाईल घेवून तू दाखवत सुटणार का? खरे तर या माध्यमाच्या अति वापरामुळे आपण फारच घसरलो आहोत.. भावना, संवेदना मारून टाकली आपण. काल रात्री श्रीरामपूर शहरातल्या एका भाजी विक्रेत्या महिलेचा व्हिडीओ व्हात्सअप ग्रुपवर पाहायला मिळाला. ती सरकारच्या नावाने शिव्या देवून शिमगा साजरा करत होती. तिचा आकांत नक्कीच असह्य होता. पोरं जेवली नव्हती तिची. नवरा आजारी असल्याने घरात पडून असल्याचं ती सांगत होती. गेले दोन दिवस भाजी मंडी बंद असल्याने हे सारं घडलं.. आता तिला यावेळी कोणी मदत करू शकत होते, पण मदत सोडाच याउलट व्हिडीओ बनवणारे लोकच तिच्यावर कुत्सितपणाने हसत होते. हे आपले नागरिक आणि ही आपली व्यवस्था. खरंच असं वाटतं या व्यवस्थेने गळा दाबलाय, कोणालाच नीटसा श्वास घेऊ देत नाहीय ती. त्यात आपलेच लोक असे व्हेंटीलेटर पळवत आहेत मग ते कितीही असले तरी काय होणार त्यातून? पुन्हा प्रश्न पडतो यात दोष कोणाचा? याचं उत्तर तुम्ही स्वत:लाच विचारा. मी फक्त इतकंच म्हणेन, कोणाला मदत करू शकत नसाल तर करू नका, पण कोणाचीच अशी विटंबना, चेष्टा तरी काजरू नका. मोबाईल हातात आले म्हणून असे व्हिडीओज काढून मुर्खपणाने शेअर करू नका. सगळी माणसं तुमच्यासारखी भावनाहीन नसतात. काही नॉर्मल पण जाणिवेनं जगणारी माणसं यामुळे उद्वस्त होतात. शेअर करणाऱ्याला यातून काय मिळत असेन? जणू काही मला समजलेली गोष्ट ब्रेकिंग न्यूज समजून एक्साईट होत ‘मीच पहिल्यांदा शेअर करतोय’ हा क्षणभर टिकणारा पोकळ आनंद? हे असं करताना जराही संकोच वाटत नाही का? अरे माणूसच आहात ना तुम्ही ? या स्तराला गेलात?  मनातली हि नकारात्मकताच सगळ्या गोष्टीचं कारण बनत आहे हे विसरू नका. नाहीतर निसर्गात माणूस सोडून सगळे प्राणी पक्षी सुखाने जगतायत यावरून तरी विचार करा. ही नकारात्मकतेची जळमटे दूर केली तर खूप काही चांगलं आहे ते तुम्ही इतरांना वाटू शकाल...त्यांना देता देता स्वत:कडेची तोच संचय होत जाईल... पण त्यासाठी आपल्याला पुन्हा माणूस होण्याची गरज आहे. माणसं खूप आहेत, लाखोंची गर्दी उसळताना दिसतेय पण या गर्दीत ‘माणूस’ सापडत नाहीय ही खंत मोठी वाटते..म्हणून या लेखाच्या उत्तरार्धात मला पाडगांवकरांची कविता आठवते –

या झोपडीत आली, वाहून ही गटारे

चिखलात हुंदक्याच्या माणूस शोधतो मी....

कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी..

गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी...

    खरंच मित्रहो, काही चुकलं असेल तर माफ करा..पण हा आक्रोश, हा हुंदका आता सहन होत नाहीय...!

                                                                                                                                                                                                                                                        - कृष्णा बेलगांवकर

Thursday, 14 January 2021

हा अट्टहास कशासाठी ...?

सण-उत्सव येतात जातात, पण या निमित्ताने माणसं खरोखर एकमेकांना माफ करतात का? राजकीय द्वेषातून निर्माण झालेल्या वैमनस्याचे लोळ अनेक माणसांच्या घरापर्यंत जाताना मी पहिली आहेत. त्या घरात असलेल्या निरपराध माणसाचंही जगणं उध्वस्त होताना, होरपळताना मी पाहिलं आहे. इतकंच नाही, हल्ली माणूस ही जमातच फार निष्ठुर होत आहे. माणसं माणसाला सहन होत नाहीयत. कुटुंबात होणारी जरासी कुरबुर सहन होत नाही म्हणून विवाहबाह्य संबंध ठेवण्यावर जावून पोहोचला हा समाज. मग फक्त एक दिवस ‘गोड बोलण्याचे’ हे सगळे बहाणे आणि अट्टहास कशासाठी? खरोखर वर्षातून एकदाच येणाऱ्या दसरा, मकरसंक्रांतीसारख्या अशा सणांच्या निमित्ताने मागचं विसरून पुढे चालता आलं असतं तर अलीकडे उध्वस्त होत चाललेली कितीतरी कुटुंब वाचली असती. इतकंच नाही, पण या देशात अगदी गुन्हेगारीचं प्रमाण देखील शून्य राहिलं असतं ...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    परवा सायंकाळी Tagline साठी एका जाहिरात एजन्सीचा कॉल आला. अर्थात Product काय आहे ,असं विचारून मी जरा वेळात त्यांना Tagline ईमेल केली- ‘चला तोंड गोड करू’. मकर संक्रांतीच्या सणाचं औचित्य असल्याने Product ला साजेशी वाटेल म्हणून मी ती सुचवली. काल त्या एजन्सीचा पुन्हा कॉल आला - आपण दिलेली Tagline आवडल्याचं कळवलं. मी सुखावलो, थोडं बरं वाटलं.

      जाहिरात, संज्ञापन आणि मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या लेखनाचे असे बरेच अनुभव येत आहेत. पण माझा मूळ पिंड ललित लेखनाचा आहे. निसर्ग, माणूस,मैत्री, प्रेम, कला-संस्कृती, विज्ञान आणि कधी कधी अगदी अध्यात्म देखील माझ्या लेखनाचा विषय होऊन जातं. हे सगळं करताना अचानक एख्याद्या जाहिरातीचं स्क्रिप्ट लिहायला येतं. तर कधी एखाद्या संक्स्कृतीक कार्यक्रमासाठी स्कीट हवंय म्हणून फोन येतो. अलीकडे पुरस्कार सोहळ्यात दिल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचंही लेखन आवडीने करतो.  हळू हळू आता हा माझा व्यवसाय बनत गेला. पण तरीही मन रमतं ते कथा,कविता आणि कादंबरीतच. का कुणास ठावूक? पण मनाला भावणाऱ्याच गोष्टी जास्त लिहिल्या जातात. कालच्या tagline चं तसंच झालं. मी लिहून दिली, त्या product ची जाहिरातही झाली खरी. पण ज्या सणाचं औचित्य होतं ते पाहता, खरोखर हा गोडवा इतक्या सहज मिळतो का? असा विचार मनात येवून गेला. काल दिवसभर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने बाहेर जावून आलो. नेहमीसारखेच चित्र पाहायला मिळाले. विशेष करून अनेकदा सोशल मिडीयावर, तसंच वृत्तपत्रातून मांजा न वापरण्याचं आवाहन करूनही मांजा घेत लहान मुलांसहित शहाणी माणसं पतंग उडविताना दिसली. होय, सण आहे ना, उडवलाच पाहिजे. वर्षातून एकदाच येतो हा सण, त्यामुळे कोणी कितीही आवाहन केलं तरी आपण नाहीच ऐकायचं, अशा मानसिकतेचे आहोत आपण. त्यामुळे कोणत्याही सणाचं खरं स्वरूप, त्यामागची भावना आपण लक्ष्यात न घेता फक्त इव्हेंट साजरा करून मोकळे होतो. किती पाखरांचा जीव जात असेल, याचा जराही अंदाज न घेता फक्त पतंग उडविला म्हणजे संक्रांत साजरी होते इतकंच वाटतं आपल्याला. Facebook  आणि Whatsaap वर तर तीळगुळाचा पाऊसच पडत गेला. म्हणजे या एका दिवसापुरती सगळी माणसं इतकी गोड झाली की आता यापुढे भांडणं, खून, हाणामाऱ्या अशा बातम्याच ऐकू येणार नाहीत असं भासलं. थोडक्यात काय तर we just gone through protocols...बाकी या उत्सवाचं खरं स्वरूप काय आहे, याचं आपल्याला काहीच घेणं नाही.

       मी लहान असताना वडिलांनी एक पुस्तक वाचायला दिल्याचं आठवतं – ‘संस्कृती पूजन’ त्या पुस्तकात सगळ्या सण-उत्सवांची इत्यंभूत माहिती दिली होती. मी सुमारे वीस एक वर्षापूर्वी ते वाचलं असल्याने सगळंच आठवत असेल असं नाही. पण महत्वाचं ते मात्र मनात रुजलं गेलं आहे. म्हणनच कदाचित मी जरा विक्षिप्त आहे. whatsaap वर मी कोनालाच  शुभेच्छा देत नाही. अगदी रिप्लायसुद्धा नाही. कारण इतके मेसेज आलेले असतात आणि तेही फक्त forwarded. म्हणजे त्यांना रिप्लाय देण्यात काहीच रस उरत नाही. जे मनापासून वाटत नाही ते मी करतच नाही. मग ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ हेही मला आता पटेनासं झालं. कारण माणसं इतकी गोड बोलतात की संशय वाटू लागतो. ‘गोड असावं, पण फक्त गोड बोलू नये’ असं माझं वैयक्तिक मत आहे. पण ते काहीही असलं तरी आपल्या आजच्या भाषेत सांगायचं सांगायचं तर एका अर्थाने कालचा दिवस एकमेकांना ‘सॉरी’ म्हणण्याचा होता. वर्षभर अनेकदा आपण कळत न काळात एकमेकांची मने दुखावतो. दैनंदिन जीवनात सोबत जगताना किंवा ऑफिसमध्ये सहकारी म्हणून सोबत काम करतानाही आपण थोडेफार नाराज होतोच एकमेकांवर. त्यासाठी सगळं विसरून या दिवशी पुन्हा नव्याने सुरुवात करयची असते. पण ते केवळ formality (औपचारिकता) म्हणून नाही तर मनापासून माफ करायचं असतं. पुरुषांनी, लहान मुलांनी देखील एकमेकांना आलिंगन देत स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी जवळीक निर्माण करायची असते. हळदी कुंकवाचे निमित्त असले तरी बायकांच्यासुद्धा एकमेकींशी वर्षभर झालेल्या कुरबुरी विसरून त्यांनी माफ करायचं असतं. या दिवशी भेट म्हणून महिला एकमेकींना काही वस्तू देतात (वाण) ती सुद्धा याच अर्थाने सुरु केलेली प्रथा आहे. एकंदरीत सगळ्यांचा स्नेह वाढवा, मनात साचलेले द्वेष नाहीसे व्हावे म्हणून हा सण साजरा केला जातो, फक्त पतंग उडवायला मिळतो म्हणून नव्हेच ! खरं म्हणजे माझा विरोध पतंगाला नसून मांजा सारख्या क्रूर धाग्याला आहे. जो कोणाला जोडण्या ऐवजी तोडण्याचं काम करतो. त्यासाठी साधा धागा वापरला तर या खेळाची मौजदेखील प्रचंड आनंद देते. कोणालाही न दुखावता उंचावर जाणारा पतंद हे माणसाच्या जगण्यात घेतल्या जाणाऱ्या भरारीचं प्रतिक आहे. पण पक्षी, प्राणी आणि आपल्यातलीच काहींना जखमी केलं जात असेल तर या उत्सवात ‘गोडवा’ कसला?  काळजी घेतली तरच तोंड गोड होईल...अन जगणंही !   

      मी लेखात नाराजीचा सूर जास्त आळवला आहे, कारण गेली काही वर्षे अशा सणाचं महत्व आपण विसरत चाललो आहोत हे प्रकर्षाने जाणवत आहे. आपल्या संस्कृतीत सुरु झालेल्या काही परंपरा आपल्याला (माझ्या आणि माझ्या नंतरच्या पिढीला) कदाचित रुचत नसतील, त्याचे अर्थ समजत नसतील म्हणून आपण त्याचे संदर्भ शोधले पाहिजे. जुन्या, बुजुर्ग व्यक्तींचा हात धरून त्यांच्याशी याबद्दल चर्चा केल्या पाहिजे. हा ऐवज आपण खरंच विसरत चाललो आहोत का? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. सध्या दुर्दैवाने सगळं उलट होताना दिसतं. आजच बघा – काल ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असं म्हणणारे माणसं ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आज विरोधी पक्षात उभे असतील. असो, पण ते राजकारण, त्यातले जय-पराजय आपण तिथेच सोडायला हवेत. ते सोबत घेत जगू लागतो तेव्हा मनातले द्वेष तसेच वाढत जातात. त्यातून सूडबुद्धी जन्म घेत राहते आणि पूर्वग्रह दुषित होतात. राजकारणाच्या बाबतीत गावकुसाच्या गोष्टीइतकचं वातावरण राज्य आणि देश पातळीवर देखील हिंसक होत चाललं आहे. तरुण पोरं ‘काम नाही’ असं म्हणत या हिंसेचा भाग बनत आहेत. बाप एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात. दोघेही केवळ कार्यकर्ते म्हणून एकमेकांचे कट्टर विरोधक होतायत आणि आपली खरी नाती विसरून दुसऱ्यासाठी लढतायत. हा इतका झपाट्याने वाढलेला द्वेष एका दिवसात वाटल्या जाणाऱ्या ‘तीळ गुळाने’ कसा नाहीसा होईल?  म्हणूनच मला प्रश्न पडतो – सण-उत्सव येतात जातात, पण या निमित्ताने माणसं खरोखर एकमेकांना माफ करतात का? राजकीय द्वेषातून निर्माण झालेल्या वैमनस्याचे लोळ अनेक माणसांच्या घरापर्यंत जाताना मी पहिली आहेत. त्या घरात असलेल्या निरपराध माणसाचंही जगणं उध्वस्त होताना, होरपळताना मी पाहिलं आहे. इतकंच नाही, हल्ली माणूस ही जमातच फार निष्ठुर होत आहे. माणसं माणसाला सहन होत नाहीयत. कुटुंबात होणारी जरासी कुरबुर सहन होत नाही म्हणून विवाहबाह्य संबंध ठेवण्यावर जावून पोहोचला हा समाज. मग फक्त एक दिवस ‘गोड बोलण्याचे’ हे सगळे बहाणे आणि अट्टहास कशासाठी? खरोखर वर्षातून एकदाच येणाऱ्या दसरा, मकरसंक्रांतीसारख्या अशा सणांच्या निमित्ताने मागचं विसरून पुढे चालता आलं असतं तर अलीकडे उध्वस्त होत चाललेली कितीतरी कुटुंब वाचली असती. इतकंच नाही, पण या देशात अगदी गुन्हेगारीचं प्रमाण देखील शून्य राहिलं असतं ...पण आपण केवळ कागदावर चालतो...We just goes through protocols...!

 

                                                                                    - कृष्णा बेलगांवकर

#Tagline  #advertisement  #Content_writer

 

Monday, 10 August 2020

‘जिन हातोंने कत्ल किये...'


रस्त्याच्या बाजूला अलबेल उभ्या असलेल्या सगळ्या झाडांच्या कत्तली करण्याचं प्रशासनाने फर्मान काढलं. ऐन कोरोना संचारबंदीच्या काळात जमावबंदी असतानाही काही तासातच, काही माणसे टोळी टोळीने येवून फडशा पाडू लागलीत या झाडांचा. झाडं बिचारी एकमेकांकडं पाहून मुसमुसून रडली. क्षणार्धात कोसळली...आपल्याच सावलीत लहानाची मोठी झालेली लेकरं आज विजेवरच्या करवती घेवून अंगावर धावून आली...या विवंचनेतच प्राण सोडला बिचार्यांनी. कोरोना’ने मात्र माणसावर मेहेरबानी केली. पंधरा दिवसांची मुदत दिली. नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करू देले. काहीना सोबत नेलं, काहीना समज देवून सोडून दिलं. माणसांनी मात्र झाडांना कुठलीच सूचना दिली नाही..कुठलाच निर्वाळा नाही की निरोप नाही. बिचाऱ्यांची उन्हात उभी असेलेली कुटुंब जशीच्या तशी आडवी केली...फर्मान निघालंय म्हणे...शहराचं नवनिर्माण करायचं!

 कृष्णा बेलगांवकर I UPDATES   I 10 AUGUST 2020 

        ---------------------------------------------------------------------

      २००६ सालची गोष्ट. मी पहिल्यांदा नगर शहर बघत होतो. निमत्त आकाशवाणीच्या ‘युवामंच’ कार्यक्रमात कवितांबद्दल मुलाखत रेकोर्डीगचं. औरंगाबाद हायवेला ‘गुलमोहोर रोड’लगत असलेल्या स्टॉपला  उतरल्यावर पत्ता विचारत, आकाशवाणीचं टॉवर बघत निघालो. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ‘गुलमोहोरा’च्या अनेक झाडांनी लक्ष वेधून घेतलं. ऐन उन्हाळाच सुरु झाला होता. हिरव्यागार सावल्या रस्त्यावर पसरलेल्या आणि वर पाहिलं तर भरजरी लाल वस्राचं आच्छादन पांघरावं तशी गुलमोहोराची लालबुंद फुलं. क्षणभर आपण कशासाठी आणि कुठे आलो हे विसरूनच गेलो. वाटेवर ठिकठिकाणी पसरलेल्या त्या झाडांच्या सावल्यांनी वाट सोपी केली. एका ठिकाणी झाडाच्याच सावलीत उसाचा गाडा दिसला. रस प्यालो आणि त्याच माणसाला विचारलं आकाशवाणीचं कार्यालय कुठे आहे? त्याने हात करत दाखवलं आणि मी आत आलो.

       तसं पाहिलं तर शहरात अन्य जातीची अनेक झाडे आहेत. पण ‘गुलमोहोर’ त्यातही सगळ्यात जास्त. उष्ण कटिबंध प्रदेशात ऐन वैशाखात फुलणारा हा वृक्ष. सगळी झाडं आपली पानं झाडतात त्याचवेळी हा बिचारा फुलून येतो, आपलं हिरवेपण जपून ठेवतो. खरं पाहिलं तर हे झाड ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोप यांसारख्या देशात जास्त प्रमाणात आहे. भारतातही बहुतांश शहरात बर्यापैकी आहेच. पण आपल्या नगर शहरात इतक्या संखेनं ही झाडं केव्हा आणि कशी आली असतील? मी शहरात पहिल्यांदा आलेल्या त्या अगदी सुरुवातीच्या क्षणापासून तर आज कित्येक वर्ष झाली, माझ्या मनात हे कुतूहल दडून आहे. या झाडांनी आपल्या शहराचं सौंदर्य जितकं जपलं तितकाच आपला मोकळा श्वास देखील जपलाय हेही आपल्याला मान्यच करावं लागेल.

       पण मी हे सारं आजच का बोलतोय? नेमकं कारण काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असणार. पडायलाच हवा. तर हे सारं सांगण्याचं कारण आज हि झाडं फार संकटात आहेत. इतकी की जितकी माणसं व्हेंटीलेटर लावून शेवटच्या श्वासाकडे एकटक बघत होती. पण माणसांना लागण होती कोरोना सारख्या विषाणूची...या झाडांना मात्र माणसांचीच लागण झालीय.

       शहरातल्या अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे प्रशासनाने हाती घेतलीत म्हणे. अन त्यासाठी रस्त्याच्या बाजूला अलबेल उभ्या असलेल्या सगळ्या झाडांच्या कत्तली करण्याचं प्रशासनाने फर्मान काढलं. ऐन कोरोना संचारबंदीच्या काळात जमावबंदी असतानाही काही तासातच, काही माणसे टोळी टोळीने एवून फडशा पाडू लागलीत या झाडांचा. झाडं बिचारी एकमेकांकडं पाहून मुसमुसून रडली. क्षणार्धात कोसळली...आपल्याच सावलीत लहानाची मोठी झालेली लेकरं आज विजेवरच्या करवती घेवून अंगावर धावून आली...या विवंचनेतच प्राण सोडला बिचार्यांनी. कोरोना’ने मात्र माणसावर मेहेरबानी केली. पंधरा दिवसांची मुदत दिली. नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करू देले. काहीना सोबत नेलं, काहीना समज देवून सोडून दिलं. माणसांनी मात्र झाडांना कुठलीच सूचना दिली नाही..कुठलाच निर्वाळा नाही की निरोप नाही. बिचाऱ्यांची उन्हात उभी असेलेली कुटुंब जशीच्या तशी आडवी केली...फर्मान निघालंय म्हणे...शहराचं नवनिर्माण करायचं!

       मान्य करतो मी. तुमच्या, पालीकेच्या हद्दीत असलेलीच झाडं तोडलीत तुम्ही. पण आज ती झाडं कोसळताना पाहून मनाला प्रचंड यातना झाल्या. मी निश:ब्द उभा राहिलो. फोटो काढले, व्हिडीओ काढले. शेवटचेच. यानंतर पुन्हा कधीतरी उन्हाळा, येईल, वैशाख येईल..फेरीवाले आपले गाडे घेवून नवीन झालेल्या रस्त्याचा कडेला उभे राहतील. काढून टाकलेली अतिक्रमणे पुन्हा तो नवीन रस्ता काबीज करतील. पालिकेचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी हप्ता घेवून गप्प बसतील...पण ज्या झाडांनी श्वास दिला ती ‘गुलमोहोराची झाडं’ पुन्हा भगवी-लाल आच्छादन डोक्यावर पसरवणार नाहीत. या धुळीत माखलेल्या वाटेवरून जाताना आज पसरलेली साऊली त्या नवीन झालेल्या रस्त्यावर कधीच दिसणार नाही. कारण कोरोना सारख्या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूवर लस न शोधू शकणारी माणसं आम्ही. एक जग उध्वस्त करून दुसऱ्या जगाचं नवनिर्माण करायला निघालोय.. माणसांवर हल्ले झाले असते तर ? रस्त्यावर गर्दीच गर्दी उतरली असती. पोलिसांच्या गाड्यांनी घेराव घालत संचारबंदी जाहीर केली असती. अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्ह्याची नोंदही केली गेली असती.. मात्र झाडांना जाणीव पूर्वक मारलं जातं. कारण...कारण ती सरळ वाढत जातात..रस्त्यावर अतिक्रमण करत नाहीत, ठरवून दिलेल्या जागेवरच वाढत जातात...महत्वाच म्हणजे ती कोणालाही ‘हप्ता’ देत नाहीत. म्हणून ...!

       मी गलबलून गेलो. सहज तो व्हिडीओ, फोटो स्टेट्सला ठेवला. तर दुपारपासून शहरातील वेगवेगळ्या भागातील मित्रांचे मेसेज आलेत – ‘आमच्याही परिसरात हेच होतंय.’ गेल्या वर्षी मुंबईतल्या ‘आरे’ सारख्या वसाहतीभोवतालचं जंगल नाहीस झालं. ते पाहून खूप हळहळलो ना आपण? मग आज आपल्याच अंगणातली झाडं जमीनदोस्त होताना पाहून काहीच नाही का करू शकत आपण? नाही माझा रस्ता दुरुस्तीसाठी विरोध मुळीच नाही. त्यासाठी भोवतालची अतिक्रमणे नक्की हटवा. अनधिकृत बांधलेल्या इमारतीही पाडा. कारण कधी ना कधी माणसं पुन्हा ते अतिक्रमण करणारच आहेत. हे प्रशासनालाही चांगलं माहित आहे. पण वर्षानुवर्षे शहराला मोकळा श्वास देणार्या या झाडांना वाचवून नाही का रस्ता बनू शकत? इतकं मोठं शहर आहे का आपलं? आणि असलं तरीही शहरातील अंतर्गत रस्त्याने अशी कोणती अवजड वाहतूक केली जाते की ज्यासाठी रस्ते इतके रुंद हवे आहेत? आणि याचंही उत्तर असेल तर याचीही काळजी घ्या की गेलेल्या झाडांसारखे त्या जागेवर नवीन रस्ता झाल्यावरही कोणतंच अतिक्रमण होणार नाही. मूळ प्रश्न हाच आहे. इथे काय करू शकतो आपण? जिथे माणसं आपलं ऐकू शकत नाही, तिथे झाडांवर जबरदस्ती का? याबाबतीत पुणेकरांना खरंच सलाम द्यायला हवा. त्यांनी एक समिती स्थापन केली आहे, निसर्ग संवर्धन, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक आणि काही प्राध्यापक तसेच शास्रज्ञ देखील या समितीचे सदस्त्य आहेत. शहरातलं कुठलंही झाड कुठल्याही कारणास्तव तोडायचं असेल तर अगदी प्रशासनालासुद्धा त्यासाठी या समितीची परवानगी घ्यावी लागते. तिही बहुतांशी नाकारलीच जाते. आपल्याकडे का नाहीय असं ? उलट भरदिवसा असं झाडांच्या कत्तली करण्याचं फर्मान काढलं जातं. आपल्याला रस्ते हवेच आहेत, पण झाडं नकोशी झाली, असं नाहीय ना? त्यामुळे आपलं व्हिजन कुठे चुकत तर नाही ना? याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या सिस्टीमचा हाच तर प्रश्न आहे. आजच्या प्रशासनाला रस्ता बनवायचा आहे, त्यासाठी ते झाडे तोडतायत. काही वर्षांपूर्वी या झाडांची लागवड करताना तत्कालीन प्रशासनाचंसुद्धा काहीतरी व्हिजन असेलच ना? आपण फक्त वर्तमानाचाच का विचार करतो? शहरातील काही पर्यावरण, निसर्गप्रेमी व्यक्तींनी याबाबत मार्गदर्शन करायला, पुढे यायला काय हरकत आहे?

                आता मला भीती वाटायला लागलीय. आधीच कोरोनासारख्या विषाणूच्या प्रदुर्भावामुळे अगतिक झालेलं हे शहर झाडांच्या कत्तलीनंतर सगळंच ओकाबोकी दिसू लागलं तर? ऐन लग्नाच्या वयात आलेल्या तरुण पोरीचं टक्कल करावं असंच नाही का वाटणार? हे विद्रूप चित्र पहायचं नसेल तर आपल्याला जागं झालं पाहिजे. कारण इतक्या दिवस या शहराने आपल्याला कवेत घेतलंय, आता आपण त्याला जवळ घ्यावं याची कदाचित ते वाट पाहत असेल....

       या विवंचनेचा शेवट करताना खूप वर्षापूर्वी मीच लिहिलेल्या कवितेच्या ओळी आज मला इथे आठवतायत -

 जिन हतोंने कत्ल किये

उन हातोंनेही इल्झाम लगाये

दिल कुछ सोच रहा था, दिमाग कुछ ओर..

वक्त ने हिसाब पुछा

- ऐसा नवनिर्माण क्यो?

     अर्थात आपण योग्य भूमिका घेतली नाही तर कधी ना कधी ‘वेळ’ याचा हिशेब मागणारच आहे...! तूर्तास हा निर्णय ‘सगळे नगरकर’ तुमच्या स्वाधीन..

 krishnainfo14@gmail.com

Monday, 8 June 2020

जगणं सॅनिटाईज करताना...

 ‘’एखाद्या वेळी पाऊस नाही पडला म्हणून आपली बाग सुकू द्यायची नाही. तुमचा प्रश्नही योग्यच आहे ‘ पाणी कुठून आणायचं?’ मी सांगेन ‘ते खरंच मलाही माहित नाहीय. पण तरीही आपली बाग जपायची, जगवायचीय आपल्याला. आणि कोण म्हणालं झाडं जागवायला फक्त पाणीच लागतं? ते लागतंच, पण त्याशिवाय कित्येक वादळ आणि ऊन-वारा झेलावा लागतो. हे सारं असताना झाडं सहज उन्मळून पडतात का? मुळीच नाही. तर हे सारं सहन करत ती तग धरतात; पाऊस येईपर्यंत. मग पुन्हा हिरवी होतात...आपल्यालाही तेच करायचं आता. आपल्या मनातली बाग जपायची आहे. सध्या फक्त हातात उरलं इतकंच करायचं. आभाळ झाकोळलंय, पाऊसही येईल...तोपर्यंत या बागेतली सारी झाडं शाबूत ठेवायची..’’

                    कृष्णा बेलगांवकर I नगर टाईम्स   I 30 May 2020 
------------------------------------------------------------------------------------------------------------------

    
     मला इतकंच माहितीय एखाद्या वेळी पाऊस नाही पडला म्हणून आपली बाग सुकू द्यायची नाही. तुमचा प्रश्नही योग्यच आहे पाणी कुठून आणायचं?’ मी सांगेन ते खरंच मलाही माहित नाहीय. पण तरीही आपली बाग जपायची, जगवायचीय आपल्याला. आणि कोण म्हणालं झाडं जागवायला फक्त पाणीच लागतं? ते लागतंच, पण त्याशिवाय कित्येक वादळ आणि ऊन-वारा झेलावा लागतो. हे सारं असताना झाडं सहज उन्मळून पडतात का? मुळीच नाही. तर हे सारं सहन करत ती तग धरतात; पाऊस येईपर्यंत. मग पुन्हा हिरवी होतात...आपल्यालाही तेच करायचं आता. आपल्या मनातली बाग जपायची आहे. सध्या फक्त हातात उरलं इतकंच करायचं. आभाळ झाकोळलंय, पाऊसही येईल...तोपर्यंत या बागेतली सारी झाडं शाबूत ठेवायची.. ‘लोंकडाउन स्टोरी २०२०डोक्युमेंटरीचं एडिट करत असताना रात्री अचानक डायरीत या ओळी लिहिल्या. का पण? याचा आपल्या डॉक्युमेंटरीशी काय संबध आहे? असं लिहून होईपर्यंत एकदाही स्वतःला विचारलं नाही मी. पण नंतर एडीट टाईमलाईन स्क्रीनवर तशीच ठेवून मी ल्यापटॉप मधलं फुटेज बघायला सुरुवात केली. खरं तर आधीच संवेदनशील असल्यामुळे मी हा विषय निवडला होता. परंतु पुढे एक एक घटना बघताना मन हादरून गेलं.    काही दिवसांपूर्वी माझ्या सोशल मिडियावरील मित्रांना, बांधवाना मी विनंती केली होती की, कोरोना विषाणूचा प्रसार आणि लॉकडाऊनच्या काळात आलेले अनुभव शक्य त्या पद्धतीने मला शेअर करा. त्याबाबत मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण खरं सांगायचं तर हे सारं पाहून, वाचून, ऐकून मी थक्क झालो. दरम्यान मी न्यूज पाहणं बंद केलं असलं तरीही फेसबुक, व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक प्रसंग मनाला हादरा देवून गेले आणि न राहवून मी पुन्हा वास्तवाचा कानोसा घेण्याचा धीर केला. खरोखर जीव कासाविस होतोय आता. हे बघवत नाही. वाटलं होतं काहीतरी ठोस निर्णय होतील अन आज उद्या संपेल हे संकट. परंतु दिवसेंदिवस त्याची तीव्रता अजूनही वाढतच चाललीय. नाही, मी याबाबत सरकारला मुळीच वेठीस धरत नाही. धरणारही नाही. कारण तितक्या प्रमाणात आपणही प्रतिसाद देवू शकलो नाही. आपल्यात वेळोवेळी निर्माण झालेले समज, त्यातून वाढलेले द्वेष याही काळात प्रचंड जपलेत आपण. त्यामुळे या संकटाचं गांभीर्य आपल्याला समजलंच नाही. मी टिका करत नाही परंतु तरीही हे कटू सत्य सांगणं महत्चाचं वाटतं की एकीकडे भर उन्हात होरपळत काही बांधव मैलोनमैल अंतर उपाशी चालत होते; मात्र त्याचवेळी दुसरीकडे काही भगिनींची खाद्य पदार्थांच्या रेसिपीजची स्पर्धा रंगली होती. मी नाही सांगत की तुम्हीही उपाशी राहा, पण किमान आपण काय करतो आहोत ? हि वेळ कोणती आहे? याचं भान तरी ठेवूया..? शेवटी स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं तरीही नैतिकता, सद्सद्विवेक कामाला यायला हवा. याबाबतीत खेड्यातील माणसाचं उदाहरण गर्वाने देता येईल. शाजार्याच्या घरात एखादी दुखद घटना घडून गेली असेल तरी भोवतालची इतर कुटुंबदेखील त्या वर्षी दिवाळीचं गोडधोड बनवत नाहीत. का? तर हि आपली संस्कृती आणि संस्कार आहेत म्हणून. मला वाटलं होतं शिक्षणाने माणूस उन्नत होतो पण तो तितकाच मागासदेखील होतो हे या काळात प्रकर्षाने जाणवलं. कुठल्याशा स्टेशनवर अन्नाविना एका तानुल्याची माय गेली तर ते बिचारं लेकरू मरणसमजत नसताना व्याकूळ होवून माईच्या अंगावरची चादर ओढताना पाहिलं. त्या क्षणी माझा देश पराभूत झाला. तो क्षण मनाला नेहमीचंच विषन्न करून गेला. दुसरीकडे त्याचवेळी आम्ही नथीचा आकडाच मिरवत होतो...मी पुन्हा सांगेन कि मी टीका करत नाही. परंतु आपण कुठल्या परिस्थितीचा सामना करतो आहोत याचं भान समाजालातल्या प्रत्येक घटकाला असायला हवं. एरव्ही वेळ जात नाही, किंवा टाईमपास म्हणून बरंच काही चांगलं करण्यासारखं होतं. कित्येक कलाकारांनी लाईव्ह येवून एकमेकांना मार्गदर्शन केलं. यातून समाजाला आधारच मिळतो. पण एकीकडे अन्नासाठी वणवण फिरणारा वर्ग असताना दुसरीकडे त्याच अन्नाचं प्रदर्शन करणं हे अजीबात योग्य वाटत नाही. वाटणारही नाही. असं करणारांनी ही खरंच आपली संस्कृती आहे का? हे स्वतःला विचारातला हवं. दुसरीकडे हेच वास्तव भलत्याच टोकाला जावून पोहोचलं. काही महाभागांनी याच काळात अडवणूक करून आपल्याकडील वस्तूंची भाववाढ केली. हि वेळ कमावण्याची नसून एकमेकांना जगवण्याची आहेहे इतकं साधं समजू नये?  असाच खेद नेते आणि कार्यकर्त्याच्या बाबतीतही वाटतो. ऐन संकटाच्या काळात आमच्या राजकीय टोळ्या इतक्या सक्रीय झाल्या की प्रशासनाचे सगळे नियम आम्ही मोडीत काढले. स्वतः सोबत समान्य माणसांच्या जीवाचेदेखील खेळ केले तुम्ही, जराही लाज नाही वाटली का? अजूनही नोंद करून ठेवा - वेळ कोणाचंही पद आणि रुबाब बघून येत नाही. तिला कोणाच्याही दरबारात येण्याची कधीही मुभा असते. तुम्ही कितीही कमवा शेवटी मर्त्य माणसाच्या अखेरच्या सदर्याला खिसा नसतोहेही ध्यानात असुद्या.बाकी आम्ही हात धुण्यात नेहमी पुढे आहोत. यावेळी सॅनिटाईजर वापरून धुतलेत हेही विसरून चालणार नाही. लॉकडाऊनच्या काळात कठोर बंदोबस्त असतानाही आपण घातलेला धुमाकूळ, पोलीस बांधवांवर केलेले हल्ले...असे कितीतरी बेशिस्त पराक्रम ऐन संकटकाळातदेखील आपण नोंदवून ठेवलेत. पण आता या टप्प्यावर आलोच आहोत तर काही गोष्टीचे धडे घ्यायला हरकत नसावी. कारण आपण कितीही बुद्धिवादी आणि विज्ञानवादी असलो तरी कोरोना सारख्या एका अदृश्य विषाणूने आपल्याला चालताबोलता बंदीस्त केलंय. अगदीच स्पष्ट बोलायचं तर या घडीला आपण निसर्गाच्यासमोर पराभूत आहोत, हे मान्यच करायला हवं. ज्या मानवतेच्या नावाने आपण एकमेकांना व्याख्याने ऐकवत आलोत तीच मानवता आज आपली आतुरतेने वाट बघते आहे. यानिमित्ताने निसर्ग खूप काही शिकवू पाहतोय आपण एकजुटीने त्याला शरण जाण्याची गरज आहे.       शेवटी काही माणसांचे आभार देखील मानायला हवेत. ही याच समाजाची दुसरी पण भक्कम बाजू आहे. ही माणसं नसती तर आपला समाज कधीच कोसळला असता. पण या देवदूतांनी अनेकांचे प्राण वाचवले. पोलीस, पत्रकार, डॉक्टर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठलीच परवानगी नसतानाही जीव धोक्यात घालून भुकेलेल्या जीवांना घास भरवण्यासाठी पुढे आलेले स्वयंसेवक. ही प्रेरणा आहे, ही संवेदना आहे, ही जाणीव आहे..आणि ही चार दोन देवदुतांसारखी माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच या समाजाचं अस्तित्व टिकून राहील असं म्हणायला हरकत नाही. बाकी वेळेचा, काळाचा कुठलाही भरोसा आता उरलेला नाही. निसर्ग जितकं रौद्र रूप धारण करतोय तितकीच आपली काळजी देखील घेतो आहे. पण हे नेहमी होईलच असं नाही. त्याच्या नजरेत आपण फक्त एक सजीव आहोत. आपली भूमिका इतर सजीवाच्या तुलनेत श्रेष्ठ असेल तर नक्कीच उत्तम, परंतु ती चुकीची ठरू नये. काहीतरी महत्वाचा संदेश निसर्ग नोंदवू पाहतोय. परंतु आपण अजूनही जागे होत नाहीय. त्याला संपवायचंच असतं तर कोणतंही प्रलय सहज शक्य होतं. परंतु केवळ मानव जातीचाच हस्तक्षेप वाढलाय इतकाच संदेश देवू पाहतोय निसर्ग. कारण कोरोना सारख्या विषाणूने गेले काही दिवस सगळं जग बंद ठेवलं परंतु ते केवळ माणसांपुरतच. बाकी सारे प्राणी, पक्षी आहे तसेच जगतायत...बंदिस्तआपण आहोत जे स्वताला मुक्त समजतात.एका अर्थाने कोरोना सारखे कितीतरी अदृश्य विषाणू आपल्या मनात साचलेले असतील. त्यांना हटवून एकमेकांसाठी आपलं जगणं सॅनिटाईजकरण्याची हीच वेळ आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस हेच स्वप्न बघतोय... खरंच जगणं सॅनिटाईज करता आलं तर ? मनातले राग, लोभ, सूड, द्वेष हे सारं निखळून पडेल आणि सगळं जग निरागस होईल !       पुन्हा इतकंच म्हणेन, वेळ कठीण असली तरीही अजून फार काही घडलेलं नाही. आपण प्रत्येकाने आपल्यापुरती आपली बाग जपायचीय...पुन्हा सारं हिरवं होईल...यात शंका नाही.