काल दुपारचीच गोष्ट, तहसील कार्यालयासमोर दोन तरुणांना रस्त्यावर थुंकताना पाहून एका पोलिसाने चांगलंच फटकारलं आणि त्यांनी सॉरी बोलून तोंडावर मास्क चढवताच तो पोलीस तोंडात भरलेल्या माव्याची पिचकारी मारून गाडीवर निघून गेला. अशीच गोष्ट गेल्या काही दिवसांपूर्वीची- एका वृत्त वाहिनीला मत व्यक्त करताना एक मंत्री महोदय बोलले ‘मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा’ पण हे सांगताना ते स्वत: मात्र विना मास्कचेच वावरत होते.,आणि आश्चर्य म्हणजे त्यांना एकाही पत्रकाराने याबाबत विचारणा केली नाही, कारण त्या सगळ्यांनी तोंडावर ‘मास्क’ बांधले होते. कमाल असते ना? या आणि अशा काही घटनांमुळे ‘भारत म्हणजे जगाच्या नकाशावर स्वत:चं विडंबन करणारं एकमेव राष्ट्र बनत आहे’ असं खेदाने वाटू लागतं.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साउथ कोरियात राहणाऱ्या एका संशोधक मित्राशी काल बोलत होतो. तिथली परिस्थिती अगदी नॉर्मल आहे. विशेष करून सगळे नागरिक स्वतःहून काळजी घेतायत आणि प्रशासनसुद्धा कोणतंही राजकारण न करता, न घाबरवता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहे. हीच परिस्थिती युरोपमधे असलेल्या मित्रानेही सांगितली, कालच. त्या दोघांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं जितकं स्पष्ट केलं तितकेच त्यामागची कारणं देखील स्पष्ट केली. संचारबंदी वगैरे असं काही लागू नाही केलं गेलेलं. पण लोक स्वत:हून निर्बंध लावून घेतायत. कामाशिवाय बाहेर पडत नाहीत. काही दिवस गरजा कमी केल्यात. जीवनावश्यक गोष्टींच प्राधान्याने घेतल्या जातायत अर्थात बाकीच्या गोष्टी त्यांनी स्वत:हून काही काळ थांबवल्या आहेत. नागरिकांप्रमाणेच तेथील राजकारण्यांनीदेखील हेच केलं आहे. गेले कित्येक दिवस त्यांनी एकही राजकीय सभा घेतली नाहीय. मला हे दोन्ही देश खूप आदर्श वाटतात पण याच वेळी माझ्या देशातली परिस्थिती पाहून अस्वस्थ वाटतं. माझ्याही देशातल्या नागरिकांना हेच हवं आहे ना? मग इथे का होत नाहीय असं? याची करणे आपण जाणताच. वर सांगितलेल्या दोन उदाहरणांच्या अगदी उलट परिस्थिती आपल्याकडे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना संचारबंदी हवी कि नको? या बाबत विचार मंथन करण्याइतका मी एकटा सक्षम नाही. पण तरीही प्रत्येकाने स्वत:वर काही दिवसांकरिता काही निर्बंध लावून घेतले तर? (तेही फक्त प्राथमिक गरजा सोडून इतर गोष्टींसाठी) काय हरकत आहे? आणि खरं आहे, हरकत नाहीच. कित्येक लोकांनी हे केलं सुद्धा. नगरच्या झोपडी कॅन्टीन परिसरात एका कापड दुकाना समोर बोर्ड वाचण्यात आला – ‘ कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आम्ही सेल्फ लॉकडाऊन जाहीर करत आमचं दालन बंद ठेवत आहोत.’ याशिवाय शहरातील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी गरज ओळखून हवे ते बदल केलेत. राज्यात इतर ठिकाणीही असं घडलंय. माणसं जागृत आहेत, ती प्रशासनाला सहकार्य देखील करतायत. म्हणून मला साउथ कोरिया आणि युरोप इतकंच मला माझ्या शहरातलं ‘हे’ दालन देखील कौतुकास्पद वाटतं. मात्र या गोष्टींची दखल ना इथल्या प्रशासनाने घेतली ना कोणत्या माध्यमांनी. याउलट एक घडलं एकीकडे कोरोनाचा कहर झाल्याच्या बातम्या कानावर येत असतानाही दुसरीकडे माझ्या देशात, राज्यातही ठिकठिकाणी राजकीय सभांचं आयोजन केलं गेलं. योगायोगाने त्या सभेत एकही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. कारण आपले पत्रकार राजकारण्यांच्या सोयीने बातम्या देतात. मग सभेसाठी इतकी गर्दी उसळत असताना देखील एकालाही संसर्ग होत नसेल तर या राज्यात संचारबंदीची गरजच काय? हा सामान्य जनतेचा सवाल अगदी महत्वाचा वाटतो.
दुसरीकडे सामान्य (?) लोक
(ठराविक पण मोठ्या संख्येने) स्वत:हून कार्यकर्ते म्हणवत सभांना गर्दी करतायत त्यामुळे
यात राजकारण्यांना एकांगी दोष देताच येणार नाही. हिच गोष्ट प्रसारमाध्यमांच्या
बाबतीत देखील आहे. माध्यमे भीतीचं मार्केटींग करतायत, अशी ओरड करणारी निम्म्याहून
अधिक जनता फेसबुक आणि WHATSAP वर त्याच गोष्टी एक्साईट होत वाऱ्याच्या वेगाने शेअर
करतायत. अशा जनतेचे आपणही घटक असू तर या माध्यमांना आणि या नेत्यांना आपण दोष कसे
देवू शकतो ?
एक
मात्र खरं की, गेल्या काही महिन्यात कोविड रुग्णांच्या नोंदी, त्यांचे अहवाल आणि बरे
झालेल्यांची संख्या याबाबत निश्चित माहिती न दिल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये
मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी मात्र प्रशासन आणि माध्यमे दोन्हीही
जबाबदार आणि दोषी आहेत. परवा रुग्णसंखेच्या धक्कादायक आकडेवारीची बातमी सांगताना
एका खासगी वृत्त वाहिनीने हेडलाईन मध्ये ‘अहमदाबाद’ आणि मेन स्क्रीनवर ‘अहमदनगर’
असा उल्लेख केला. मग हेडलाईन सारखाच रुग्ण संख्येचा आकडाही चुकला नसेल हे कशावरून?
हीच करणे आहेत संभ्रम निर्माण होणाची. आजच्या घडीला बातम्या पाहून देखील लोक घाबरत
नसतील तर ‘लांडगा आला रे आला’ अशी परिस्थिती झाल्यासारखं वाटू लागतं. ‘नक्की काय
खरं आणि काय खोटं? हे अजूनही स्पष्ट समजत नाही’ हा सामान्यांचा संवाद रोज कुठे ना
कुठे कानावर पडतो.
आता दोष कुणाचा
? हा सवाल विचारला तर काय उत्तर मिळेल ? उदाहरण सांगतो - काल दुपारचीच गोष्ट,
तहसील कार्यालयासमोर दोन तरुणांना रस्त्यावर थुंकताना पाहून एका पोलिसाने चांगलंच फटकारलं
आणि त्यांनी सॉरी बोलून तोंडावर मास्क चढवताच तो पोलीस तोंडात भरलेल्या माव्याची पिचकारी
मारून गाडीवर निघून गेला. अशीच गोष्ट गेल्या काही दिवसांपूर्वीची- एका वृत्त
वाहिनीला मत व्यक्त करताना एक मंत्री महोदय बोलले ‘मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक
कारवाई करा’ पण हे सांगताना ते स्वत: मात्र विना मास्कचेच वावरत होते.,आणि आश्चर्य
म्हणजे त्यांना एकाही पत्रकाराने याबाबत विचारणा केली नाही, कारण त्या सगळ्यांनी
तोंडावर ‘मास्क’ बांधले होते. कमाल असते ना? या आणि अशा काही घटनांमुळे ‘भारत
म्हणजे जगाच्या नकाशावर स्वत:चं विडंबन करणारं एकमेव राष्ट्र बनत आहे’ असं खेदाने
वाटू लागतं.’
तसं
पाहिलं तर प्रशासन देखील सगळीकडून अडचणीत सापडलं आहे, असंही वाटू लागतं. हे
नियंत्रणात आणण्याचं आव्हान सोपं नाहीच. संचार बंदी करावी तर जनतेचा आक्रोश, तोही
चुकीचा नाहीच. पण न करावी तर ‘काही’ (ठराविकच) लोक नियमबाह्य जगतात. खरे तर अशा
‘काही’ लोकांमुळेच हा देश कायमचा ‘कामाला’ लागला आहे. विशेषत: राजकारणात आलेल्या
कार्यकर्त्यांमुळे. अरे बाबांनो, तुम्ही कार्यकर्ते व्हा, राजकारण करा, पण ही ती
वेळ नाहीय हे का लक्ष्यात येत नाहीय तुमच्या? हा प्रश्न तुमच्यासह तुमच्या
कुटुंबाच्या जगण्या मरण्याचा आहे, हे डोक्यात का जात नाही? नेते बदलतात, पक्ष
बदलतात, मग त्यांच्यासाठी तुम्ही का एकमेकांशी वैर पत्करता? तेही अशा काळात? मित्रहो,
हा क्षण फार बिकट आहे, माणसाला एक एक हात मोलाचा वाटतो आहे. ओळखी-अनोळखी कोणीही
कोणासाठी देवदूत बनून उभा दिसतोय...अडचणीत असलेला जीव आकांताने हाक देतोय, त्याचा
कानोसा घेण्याची गरज आहे. थोडे दिवस, मग पुन्हा तुम्ही तुमच्या प्रांतात विराजमान
व्हा...भरपूर यश मिळवा. पण त्यासाठी चालत्या काळात एकमेकांचा आशीर्वाद घ्या. मला
माहीत नाही कितपत खरं ते, पण देव म्हणवणारे डॉक्टर देखील पैशांमुळे बदनाम झाले,
अर्थात यालाही अपवाद आहेतच. पण मेडिसिन साठी काळा बाजार होऊ शकतो या दुनितेत, ‘आशीर्वाद’
घेण्यासाठी मात्र ते कामी येत नाही. कोट्यावधी संपत्ती असलेला पुण्यातला एक सहकारी
अचानक सोडून गेला. त्याच्या घरातले व्याकूळ होवून बोलले ‘पाहिजे ती रक्कम दिली
असती, पण....’ त्या पण पुढे ‘पुण्याई’ ची कमी होती. कदाचित असंच काही असेन. निसर्ग
काहीतरी जुळवाजुळव करतोय. त्याला हिशेब लागत नसावा...किती प्राणी, किती कुत्रे,
हत्ती, मांजरं किती किटक बनवले होते त्याने? माणूस सुद्धा त्याचीच निर्मिती पण आज
त्याचीही अशी अवस्था? का? इतका साधा सवाल स्वत:ला विचारू नये का? नैतिक –
अनैतिकतेच्या मर्यादा ओलांडून माणूस नावाचा प्राणी पशुत्वाकडे चालू लागलाय म्हणून
तर नसेन होत हा विध्वंस? तसं असेल तरीही अचानक, लगेचच नाही होत हे., त्याने सूचना
दिलीय. बदलाचे संकेतही दिले..पण आपण त्याची नोंदच घेतली नाही. तांत्रिक बदलाच्या तंद्रीत
बिन्दास्त, स्वतंत्र म्हणता म्हणता खूप स्वैर होत गेलो आपण... ‘त्या’ने मात्र याची
नोंद घेतलीय. म्हणून हा पसारा हादरलाय. वादळाची चाहूल लागल्यावर वारुळात लपलेले
प्राणीही वाट मिळेल तिकडे धावू लागतात, तसच झालं ना? पायाखलची जमीन हादरली आणि
एकाएकी माणसाचा कचरा झाला. सगळ काही प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकून देताना कचर्यासारखीच
अवस्था होत नसेन का ? पण या टोकाला पोहोचल्या
माणसाला अजुनही का जाग येत नाही? कुठल्याची क्षणी श्वास बंद होण्याची चिन्हे दिसत
असतानाही एकमेकांबद्दलचे द्वेष जराही कमी होत नसतील तर हा मानवतेचा करूण पराभवच
नाही का? - सुधरा...निसर्ग एवढंच सांगू पाहतोय असं वारंवार वाटतंय.
हा
शब्द प्रपंच कोणाला चुकीचाही वाटू शकतो. तो बरा वाटावा, खरा वाटावा असाची माझा
अट्टहास नाहीच. पण जे वाटलं ते व्यक्त केलं. पुन्हा एकदा आवाहन करतो, अवती भवती
बरंच काही चांगलं देखील घडत आहे. हजारोंनी रुग्ण बरे होवून दररोज सुखरूप घरी
जातायत. त्याचीही माहिती इतरांना देत रहा. कोणाचंही ‘मनोबल’ वाढवणं हेच मोठं औषध
आहे असं समजा...होता होईल तितकं नकारात्मक बाजूला ठेवा. WHAT SAP वर आलेली प्रत्येक
गोष्ट प्रत्येकाला फॉरवर्ड केलीच पाहिजे का? का हा वेडेपणा करताय रोज? तुम्हाला
काहीच वाटत नसेल, पण कोणीतरी श्वासाची घालमेल मोजत बेडवर पडून असेन त्याच्या
नातेवाईकाचा विचार करा. परवा एका मित्राला म्हणालो हे असं भडक काही शेअर करू नकोस.
तर त्याचं उत्तर आलं - डोळे बंद केल्याने वास्तव बदलणार का ? ठिक, नसेन बदलणार ते,
घडलेलं सगळच आता मोबाईल घेवून तू दाखवत सुटणार का? खरे तर या माध्यमाच्या अति
वापरामुळे आपण फारच घसरलो आहोत.. भावना, संवेदना मारून टाकली आपण. काल रात्री
श्रीरामपूर शहरातल्या एका भाजी विक्रेत्या महिलेचा व्हिडीओ व्हात्सअप ग्रुपवर
पाहायला मिळाला. ती सरकारच्या नावाने शिव्या देवून शिमगा साजरा करत होती. तिचा
आकांत नक्कीच असह्य होता. पोरं जेवली नव्हती तिची. नवरा आजारी असल्याने घरात पडून
असल्याचं ती सांगत होती. गेले दोन दिवस भाजी मंडी बंद असल्याने हे सारं घडलं.. आता
तिला यावेळी कोणी मदत करू शकत होते, पण मदत सोडाच याउलट व्हिडीओ बनवणारे लोकच
तिच्यावर कुत्सितपणाने हसत होते. हे आपले नागरिक आणि ही आपली व्यवस्था. खरंच असं
वाटतं या व्यवस्थेने गळा दाबलाय, कोणालाच नीटसा श्वास घेऊ देत नाहीय ती. त्यात
आपलेच लोक असे व्हेंटीलेटर पळवत आहेत मग ते कितीही असले तरी काय होणार त्यातून?
पुन्हा प्रश्न पडतो यात दोष कोणाचा? याचं उत्तर तुम्ही स्वत:लाच विचारा. मी फक्त
इतकंच म्हणेन, कोणाला मदत करू शकत नसाल तर करू नका, पण कोणाचीच अशी विटंबना,
चेष्टा तरी काजरू नका. मोबाईल हातात आले म्हणून असे व्हिडीओज काढून मुर्खपणाने
शेअर करू नका. सगळी माणसं तुमच्यासारखी भावनाहीन नसतात. काही नॉर्मल पण जाणिवेनं जगणारी
माणसं यामुळे उद्वस्त होतात. शेअर करणाऱ्याला यातून काय मिळत असेन? जणू काही मला
समजलेली गोष्ट ब्रेकिंग न्यूज समजून एक्साईट होत ‘मीच पहिल्यांदा शेअर करतोय’ हा
क्षणभर टिकणारा पोकळ आनंद? हे असं करताना जराही संकोच वाटत नाही का? अरे माणूसच
आहात ना तुम्ही ? या स्तराला गेलात? मनातली हि नकारात्मकताच सगळ्या गोष्टीचं कारण
बनत आहे हे विसरू नका. नाहीतर निसर्गात माणूस सोडून सगळे प्राणी पक्षी सुखाने
जगतायत यावरून तरी विचार करा. ही नकारात्मकतेची जळमटे दूर केली तर खूप काही चांगलं
आहे ते तुम्ही इतरांना वाटू शकाल...त्यांना देता देता स्वत:कडेची तोच संचय होत
जाईल... पण त्यासाठी आपल्याला पुन्हा माणूस होण्याची गरज आहे. माणसं खूप आहेत,
लाखोंची गर्दी उसळताना दिसतेय पण या गर्दीत ‘माणूस’ सापडत नाहीय ही खंत मोठी
वाटते..म्हणून या लेखाच्या उत्तरार्धात मला पाडगांवकरांची कविता आठवते –
या झोपडीत आली, वाहून ही गटारे
चिखलात हुंदक्याच्या माणूस शोधतो मी....
कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी..
गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी...
खरंच मित्रहो, काही चुकलं असेल तर माफ करा..पण हा आक्रोश, हा हुंदका आता सहन होत नाहीय...!
- कृष्णा बेलगांवकर
