Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Sunday, 18 November 2018

राज्य नाट्य स्पर्धा , २०१८ , नाट्य समीक्षण


“छत्रपती शिवरायांचे जिहाद”

लाईट फेड ईन होत हळू हळू रंगमंच प्रकाशमान होतो..समोर न्यूज चानेलचं ऑफिस दिसतं, ऑफिसमध्ये एक न्यूज रिपोर्टर असलेली तरुण मुलगी माईक कॉलरला लावून न्यूज ब्रॉडकास्टची तयारी करतेय.एका नामांकित शहरात जातीय दंगल सुरु असल्याची बातमी ती सांगू लागते. रंगमंचावर दिसणाऱ्या या चित्रांसोबातच कानावर पडणाऱ्या संगीतामुळे खरंच काहीतरी घडतंय आणि आपण ते टीव्हीवर बघतोय असं भासायला लागतं तितक्यात ऑफिस मध्ये इलेक्ट्रिक शॉटसर्किट होतं आणि हे सगळं चित्र विस्कळीत होतं. अचानक अंधार झाल्याने निवेदिका टेकनिकल असिस्टंटला आवाज देवू पाहते परंतु कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. शेवटी दरवाजा उघडून बाहेर पडू लागते तर दारही बंद ! गोंधळलेल्या अवस्थेत ती टेबलवर डोकं ठेवून हतबल झाल्यासारखी निजते..फिरोज काझी लिखित आणि दादा नवघरे यांनी दिग्दर्शित केलेल्या “छत्रपती शिवरायांचे जिहाद” या नाटकाचं खरं कथानक इथेच सुरु होतं...
रंगमंचावरील प्रकाश योजना आणि नेपथ्य सजावट यांमुळे नाटकाच्या सुरुवातीलाच जिवंतपणा जाणवू लागतो. शीतल परदेशी या अभिनेत्रीने साकारलेली न्यूज रिपोर्टर गोंधळलेल्या अवस्थेत न्यूजरूम मध्ये निजलेली असतानाच तिला अचानक स्वप्न पडतं आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराज तिला दर्शन देतात..फक्त दर्शन देत नाहीत तर आजच्या पत्रकारांना, प्रसारमाध्यमांना उद्देशून आपल्या समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या भूमिकेबद्दल कान उघडणी करतात. फिरोज काझी यांनी केलेल्या महाराजांच्या पात्रासोबत न्यूज रिपोर्टरचे संवाद रंगत जातात आणि सामान्य प्रेक्षक कथानकात हरवून जातो..
जाती-पातीचे कडवट शृंगार चेहऱ्यावर पांघरून ठिकठिकाणी विखुरलेला आजचा समाज, आज स्त्रियांची होणारी विटंबना इतकंच नाही तर केवळ राजकारणासाठी आपल्या नावाचा आणि स्वराज्याचाही अपमान करणाऱ्या आजच्या समाजाबद्दल महाराजांचं पात्र स्वतः बोलू लागतं तेव्हा मनाची घालमेल थांबवता थांबत नाही. इतिहासाने आजपर्यंत आपल्या मनात निर्माण केलेले संभ्रम सोडवत समाजातील समानतेचे महाराजांना अपेक्षित असेलेले धोरण अधोरेखित करताना लेखकाची प्रगल्भता मनाला भिडते. याखेरीज सर्वच बाजूने प्रदुषित झालेल्या आजच्या समाजात स्त्रियांची अवस्था किती खालावली गेलीय हे सिद्ध करणारा प्रसंग मांडणारं न्यूज रिपोर्टरचं पात्र प्रेक्षालय सुन्न करून जातं. स्वतःला मावळे समजून मिरवणाऱ्या आजच्या तरुणांच्या निष्क्रियतेची उदाहरणे देत सबंध समाजाला चिंतन करायला लावणारे महाराजांच्या पात्रातील संवाद लेखकाने मोठ्या ताकदीने लिहिले आहेत. आजपर्यंत शिवाजी महाराजांचे मुस्लिमांशी शत्रुत्व असल्याची चुकीची माहिती ऐकून अनेकदा समाजात तेढ निर्माण केली जातेय; परंतु शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी वापरलेली वाघनखे ही रुस्तुम-ए-जमाल सारख्या मुस्लीम बांधवाने पुरवली होती, बाजी प्रभू देशपांडे यांच्यासोबतच पावन खिंडीत लढणारा सिद्धी इब्राहीम हाही मुस्लीम बांधव महाराजांचा मावळाच होता. इतकंच नाही तर आग्रा भेटीच्या वेळी जीव धोक्यात घालून महाराजांना वाचविणारा मदारी मेहेतर नावाचा मावळा तेव्हा उपस्थित नसता तर महाराजांना तेव्हा प्राण गमवावा लागला असता...मग इतकं सगळं महाराजांना जीवापाड जपणारे मुस्लीम त्यांचे शत्रू कसे असू शकतील ? आणि असं असतं तर महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याला मरणोत्तर सन्मान म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधून कायमची जागा का दिली असती? खानानं आमच्याशी कपट केलं त्या कपटाशी आमचं वैर होतं. तेही तो जिवंत असेपर्यंत.खान संपला, वैर संपलं.” म्हणून आम्ही खानाची कबर आजही प्रतापगडाच्या पायथ्याशी जपली आहे. मात्र हीच कबर उध्वस्त करून तुम्ही आपला इतिहास अपमानित करण्याचं षडयंत्र रचतायत याहून मोठं दुर्दैवं कोणतं असू शकेल? असा सवाल करणारा  “अस्वस्थ राजा” फिरोज काझी यांनी अभिनयातून उभा केला.
“एकवेळ आमची जयंती साजरी करू नका, परंतु आज समाजात होणारी स्त्रियांची विटंबना थांबवा” महाराजांच्या तोंडून येणारा संवाद एकाएकी सभागृह सून्न करून जातो तर “आज आम्ही जिवंत असू तर ते फक्त शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विधारांमध्ये ” असं ऐकताच टाळ्यांचा कडकडाटही होतो.  आम्हाला केवळ हिंदूंचेच राजे म्हणून का मिरवता? समाजात अराजकता, अशांतता निर्माण होते तेव्हा लोकशाहीचा आधारस्तंभ असलेले तुम्ही प्रसारमाध्यमे सत्य गोष्टींचा पाठपुरावा न करता लोकांना भडकावण्याच काम करत असाल तर ही खेदाची गोष्ट आहे. आम्हाला अपेक्षित असलेले सगळे अठरापगड जातीचे लोक एकत्र येतील तो खरा आमचा स्वराज्याचा सुवर्ण क्षण असेल, मात्र आज दाभोलकर, पानसरे अशा विचारवंतांना जर हा समाज जगू देत नसेन तर आमचे विचार कसे जगवणार? हा अस्वस्थ सवालही महाराजांचे पात्र करून जाते. आजपर्यंत महाराजांना शूर, योद्धा शिवाजी म्हणूनच ऐकत आलो, पाहत आलो परंतु आजची विषमता पाहून संवेदनशील मनाचा अस्वस्थ होणारा राजा या कथानकात पाहायला मिळाला. “छत्रपती शिवरायांचा जिहाद” सांगताना लेखकाने सामान्य रसिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची काळजी घेतल्याचे प्रकर्षाने जाणवते. आजपर्यंत जिहादचेही अनेक चुकीचे अर्थ समाजात घेतले जात होते. परंतु शिवरायांचा जिहाद मनाला खरी शिकवण देणारा होता. “जिहाद म्हणजे स्वातंत्र्य , समता,जिहाद म्हणजे संयम, जिहाद म्हणजे त्याग.. आणि जिहाद म्हणजे समतोल." 
एकूणच फिरोज काझी यांनी लिहिलेल्या या नाटकात दोनही कलाकारांनी उत्तम, दर्जेदार सादरीकरण केले. नेपथ्य, भूमिका आणि संगीत या सगळ्या बाबतीत नाटक दमदार वाटले. काही किरकोळ म्हणावे असे एक दोन संवाद रेंगाळल्याचे जाणवले परंतु सामान्य प्रेक्षकाला अनावश्यक जाणवेल अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होवू न देता सगळ्या पात्रांनी कथानक जिवंत केले हे या नाटकाचं मोठं यश वाटतं. सुहास लहासे, समीर काझी, रोहिदास गाडे, नवनाथ चेडे,गणेश लवांडे यांचे नेपथ्य आणि वाल्मिक जाधव यांची प्रकाशयोजना, दादा नवघिरे, हयुम शेख यांचे संगीत, शाम मोहिते, स्नेहल कुलकर्णी यांची रंगभूषा, आणि अभिलाषा पाटील, अरुण भारस्कर यांची वेशभूषा लाभलेलं हे नाटक सर्वच बाजूंनी प्रेक्षकांना भावेल यात शंका नाही.


- कृष्णा बेलगांवकर 



Wednesday, 7 November 2018

चला, प्रकाशमान होऊ या...



खूप दिवसांपूर्वी या खोल जलाशयाच्या तळाशी तो स्वतः चालत गेला. होय चालतच, तेही अगदी सहज. कोणताही जडत्वाचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तसं पाहिलं तर तो फक्त प्रवास होता त्याच्या लेखी ते काही मरण नव्हतं, नाही आत्महत्या ! बरं समाधी म्हणावी तर तो स्वतःला कोणी योगीही समजत नव्हता. खरी गोष्ट इतकीच की त्याला काहीतरी शोधायचं होतं; कदाचित या डोहाच्या तळाशी साचलेलं अंधारयुग ! बाकी तो प्रकाशमान होताच, नाही असं नाही. पण मनातल्या तळात साचलेला अंधार त्याला अस्वस्थ करत होता. म्हणूनच कदाचित ओंजळीत एक लख्ख दिवा घेवून तो उतरत गेला या डोहात...चार दोन पायर्यांनंतर तो पूर्ण दिसेनासा झाला...त्यानंतर पुन्हा तो कधीच दिसला नाही. कदाचित आतापर्यंत तो पोहोचलाही असेल तळाशी..नाही तो तरंगतही आला नाही वर..कारण तरंगतं ते प्रेत. तो मात्र जिवंत होता आणि जिवंतच आहे अजूनही...फरक इतकाच – तो आतून बाहेरून प्रकाशमान झालाय अन आपण फक्त आभासी उजेडात जगतोय..
दिवस गेले, वर्ष सरली...जगण्याची ही विहीर पुन्हा काठोकाठ भरली; आज इतक्या दिवसांनंतर या पाण्यावर पुन्हा तवंग आलाय...इथली वांझोटी जळमटं पाचोळ्यागत तरंगतायत, चमकतायत बाहेरच्या उजेडात. पण आतल्या अंधाराचं काय? तिथे कोणीच पोहोचायला तयार नाहीय. कित्ती दिवस झालेत, मनाला मनासारखं, मनापासून असं दिलंच नाही काही. आज या मित्राची आठवण झाली म्हणून त्याच्यासारखाच थोडा उजेड घेवून मनाच्या तळाशी उतरेन म्हणतो..तंत्रज्ञानाच्या या आभासी दुनियेतून थोडं दूर फक्त स्वतःच्याच अरण्यात जावून फक्त स्वतःलाच एक घट्ट मिठी मरीन म्हणतो...काय होतंय बघू..आज नो कॉल्स, नो मेसेजस, नो व्हाटसअप नथिंग मोअर...
रात्री घरासमोरच्या अंगणात निपचित निजावं आकाशातलं चांदणं मोजत, तितकाच हा मोह होतो अगदी आतल्या आत काहीतरी शोधण्याचा...दुर्दैवानं राग, लोभ, द्वेष, मत्सर, हेवे–दावे सारं खच्चून भरलंय मनात. एकमेकांचे सूड उगवत जाळपोळ करतोय आम्ही, जणू काही एकमेकांना संपवायलाच जन्माला आलो आपण. असं चित्र निर्माण झालं, माणसांच्या दुनियेत माणुसकी नामशेष होत चाललीय आणि तरीही आम्ही साजरं करतोय हे सगळं वरवरचं प्रकाशमय दिसणं.
वर नमूद केलेली कथा काल्पनिक असली तरीही त्यातला आशय मला पोहोचवणं गरजेचं वाटतं. दीपावली दरवर्षी  साजरी होतेय, होत राहिल परंतु आपण या प्रकाशमान करणाऱ्या सणाचा खरंच तितक्या वैचारिक अर्थाने बोध घेतो का? हा मला पडलेला प्रश्न आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आठवते - सूर्य अस्ताला जातो आहे आणि तो जाताना प्रश्न विचारतो की, माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल? तेव्हा तारे हिरमुसतात, ते बोलतात–आम्ही तर  स्वयंप्रकाशी,  स्वतः पुरतंच जगणारे, आम्हाला कसं शक्य आहे? चंद्रही ढगाआड लपून नाहीसा होतो, ग्रहांचाही नकार मिळतो. शेवटी एका झोपडीत मिणमिणत असलेला एक दिवा समोर येतो आणि हात जोडून सूर्याला म्हणतो – हे पित्या , माझं अस्तित्व तरी कितीसं ! तुज्या इतका  प्रकाश मी जागाला नाही देवू शकत, पण एक मात्र नक्की करेन, माझ्या हृदयात तेल असेपर्यंत  प्रत्येक झोपडीचा कोनाडा मी प्रकाशमान ठेवीन !
अगदी हीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. उजेड म्हणजे तरी काय शेवटी? एकमेकांना आपलंसं करणं, एकमेकांना आधार देणं, एकमेकांना घास भरवणं. पण एक खेदाची गोष्ट वाटते ती म्हणजे आमचा प्रसवास एकमेकांचे घास ओरबडण्याकडे सुरु झाला. या कवितेतल्या दिव्यासारखीच काही चांगली माणसं फार दुर्मिळ उरली समाजात आणि त्यावरच हे जग जगत आहे असं म्हणावं लागेल. कारण याउलट असलेल्या जास्त लोकांची अवस्था अगदी चंद्र तार्यासारखी आहे, ते खूप आनंदात आहेत पण तो आनंद फक्त आपल्यापुरताच. ना ते कोणाला वाटू शकत ना ते कोणाच्या दुःखाचा वाटा घेवू शकत.याचं दुसरं कारण म्हणजे आमच्या मनाची कवाडं कुजून, गंजून गेली पण आम्ही कोणासाठी ती उघडली नाही. इतकच नाही तर आम्ही आम्हाला काही मिळावं म्हणूनही कधी ती खुली केली नाहीत. वास्तवात एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र येण्याएवजी दूर गेलो आणि अवास्तव मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने घेवून एकत्र उभे राहिलो आणि म्हणूच जग ग्लोबल होत असताना माणूस एकाकी होत चालला आहे...यापेक्षा घणघोर अंधार दुसरा कोणता असेल आमच्या जीवनात?
तुमचं तुम्ही ठरवा. मी मात्र ठरवलंय आज, मनाच्या तळाशी एक तरी पणती तेवत ठेवायची....माझा कोनाडा उजळण्यासाठी !

- कृष्णा बेलगांवकर