Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Monday, 8 June 2020

जगणं सॅनिटाईज करताना...

 ‘’एखाद्या वेळी पाऊस नाही पडला म्हणून आपली बाग सुकू द्यायची नाही. तुमचा प्रश्नही योग्यच आहे ‘ पाणी कुठून आणायचं?’ मी सांगेन ‘ते खरंच मलाही माहित नाहीय. पण तरीही आपली बाग जपायची, जगवायचीय आपल्याला. आणि कोण म्हणालं झाडं जागवायला फक्त पाणीच लागतं? ते लागतंच, पण त्याशिवाय कित्येक वादळ आणि ऊन-वारा झेलावा लागतो. हे सारं असताना झाडं सहज उन्मळून पडतात का? मुळीच नाही. तर हे सारं सहन करत ती तग धरतात; पाऊस येईपर्यंत. मग पुन्हा हिरवी होतात...आपल्यालाही तेच करायचं आता. आपल्या मनातली बाग जपायची आहे. सध्या फक्त हातात उरलं इतकंच करायचं. आभाळ झाकोळलंय, पाऊसही येईल...तोपर्यंत या बागेतली सारी झाडं शाबूत ठेवायची..’’

                    कृष्णा बेलगांवकर I नगर टाईम्स   I 30 May 2020 
------------------------------------------------------------------------------------------------------------------

    
     मला इतकंच माहितीय एखाद्या वेळी पाऊस नाही पडला म्हणून आपली बाग सुकू द्यायची नाही. तुमचा प्रश्नही योग्यच आहे पाणी कुठून आणायचं?’ मी सांगेन ते खरंच मलाही माहित नाहीय. पण तरीही आपली बाग जपायची, जगवायचीय आपल्याला. आणि कोण म्हणालं झाडं जागवायला फक्त पाणीच लागतं? ते लागतंच, पण त्याशिवाय कित्येक वादळ आणि ऊन-वारा झेलावा लागतो. हे सारं असताना झाडं सहज उन्मळून पडतात का? मुळीच नाही. तर हे सारं सहन करत ती तग धरतात; पाऊस येईपर्यंत. मग पुन्हा हिरवी होतात...आपल्यालाही तेच करायचं आता. आपल्या मनातली बाग जपायची आहे. सध्या फक्त हातात उरलं इतकंच करायचं. आभाळ झाकोळलंय, पाऊसही येईल...तोपर्यंत या बागेतली सारी झाडं शाबूत ठेवायची.. ‘लोंकडाउन स्टोरी २०२०डोक्युमेंटरीचं एडिट करत असताना रात्री अचानक डायरीत या ओळी लिहिल्या. का पण? याचा आपल्या डॉक्युमेंटरीशी काय संबध आहे? असं लिहून होईपर्यंत एकदाही स्वतःला विचारलं नाही मी. पण नंतर एडीट टाईमलाईन स्क्रीनवर तशीच ठेवून मी ल्यापटॉप मधलं फुटेज बघायला सुरुवात केली. खरं तर आधीच संवेदनशील असल्यामुळे मी हा विषय निवडला होता. परंतु पुढे एक एक घटना बघताना मन हादरून गेलं.    काही दिवसांपूर्वी माझ्या सोशल मिडियावरील मित्रांना, बांधवाना मी विनंती केली होती की, कोरोना विषाणूचा प्रसार आणि लॉकडाऊनच्या काळात आलेले अनुभव शक्य त्या पद्धतीने मला शेअर करा. त्याबाबत मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण खरं सांगायचं तर हे सारं पाहून, वाचून, ऐकून मी थक्क झालो. दरम्यान मी न्यूज पाहणं बंद केलं असलं तरीही फेसबुक, व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक प्रसंग मनाला हादरा देवून गेले आणि न राहवून मी पुन्हा वास्तवाचा कानोसा घेण्याचा धीर केला. खरोखर जीव कासाविस होतोय आता. हे बघवत नाही. वाटलं होतं काहीतरी ठोस निर्णय होतील अन आज उद्या संपेल हे संकट. परंतु दिवसेंदिवस त्याची तीव्रता अजूनही वाढतच चाललीय. नाही, मी याबाबत सरकारला मुळीच वेठीस धरत नाही. धरणारही नाही. कारण तितक्या प्रमाणात आपणही प्रतिसाद देवू शकलो नाही. आपल्यात वेळोवेळी निर्माण झालेले समज, त्यातून वाढलेले द्वेष याही काळात प्रचंड जपलेत आपण. त्यामुळे या संकटाचं गांभीर्य आपल्याला समजलंच नाही. मी टिका करत नाही परंतु तरीही हे कटू सत्य सांगणं महत्चाचं वाटतं की एकीकडे भर उन्हात होरपळत काही बांधव मैलोनमैल अंतर उपाशी चालत होते; मात्र त्याचवेळी दुसरीकडे काही भगिनींची खाद्य पदार्थांच्या रेसिपीजची स्पर्धा रंगली होती. मी नाही सांगत की तुम्हीही उपाशी राहा, पण किमान आपण काय करतो आहोत ? हि वेळ कोणती आहे? याचं भान तरी ठेवूया..? शेवटी स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं तरीही नैतिकता, सद्सद्विवेक कामाला यायला हवा. याबाबतीत खेड्यातील माणसाचं उदाहरण गर्वाने देता येईल. शाजार्याच्या घरात एखादी दुखद घटना घडून गेली असेल तरी भोवतालची इतर कुटुंबदेखील त्या वर्षी दिवाळीचं गोडधोड बनवत नाहीत. का? तर हि आपली संस्कृती आणि संस्कार आहेत म्हणून. मला वाटलं होतं शिक्षणाने माणूस उन्नत होतो पण तो तितकाच मागासदेखील होतो हे या काळात प्रकर्षाने जाणवलं. कुठल्याशा स्टेशनवर अन्नाविना एका तानुल्याची माय गेली तर ते बिचारं लेकरू मरणसमजत नसताना व्याकूळ होवून माईच्या अंगावरची चादर ओढताना पाहिलं. त्या क्षणी माझा देश पराभूत झाला. तो क्षण मनाला नेहमीचंच विषन्न करून गेला. दुसरीकडे त्याचवेळी आम्ही नथीचा आकडाच मिरवत होतो...मी पुन्हा सांगेन कि मी टीका करत नाही. परंतु आपण कुठल्या परिस्थितीचा सामना करतो आहोत याचं भान समाजालातल्या प्रत्येक घटकाला असायला हवं. एरव्ही वेळ जात नाही, किंवा टाईमपास म्हणून बरंच काही चांगलं करण्यासारखं होतं. कित्येक कलाकारांनी लाईव्ह येवून एकमेकांना मार्गदर्शन केलं. यातून समाजाला आधारच मिळतो. पण एकीकडे अन्नासाठी वणवण फिरणारा वर्ग असताना दुसरीकडे त्याच अन्नाचं प्रदर्शन करणं हे अजीबात योग्य वाटत नाही. वाटणारही नाही. असं करणारांनी ही खरंच आपली संस्कृती आहे का? हे स्वतःला विचारातला हवं. दुसरीकडे हेच वास्तव भलत्याच टोकाला जावून पोहोचलं. काही महाभागांनी याच काळात अडवणूक करून आपल्याकडील वस्तूंची भाववाढ केली. हि वेळ कमावण्याची नसून एकमेकांना जगवण्याची आहेहे इतकं साधं समजू नये?  असाच खेद नेते आणि कार्यकर्त्याच्या बाबतीतही वाटतो. ऐन संकटाच्या काळात आमच्या राजकीय टोळ्या इतक्या सक्रीय झाल्या की प्रशासनाचे सगळे नियम आम्ही मोडीत काढले. स्वतः सोबत समान्य माणसांच्या जीवाचेदेखील खेळ केले तुम्ही, जराही लाज नाही वाटली का? अजूनही नोंद करून ठेवा - वेळ कोणाचंही पद आणि रुबाब बघून येत नाही. तिला कोणाच्याही दरबारात येण्याची कधीही मुभा असते. तुम्ही कितीही कमवा शेवटी मर्त्य माणसाच्या अखेरच्या सदर्याला खिसा नसतोहेही ध्यानात असुद्या.बाकी आम्ही हात धुण्यात नेहमी पुढे आहोत. यावेळी सॅनिटाईजर वापरून धुतलेत हेही विसरून चालणार नाही. लॉकडाऊनच्या काळात कठोर बंदोबस्त असतानाही आपण घातलेला धुमाकूळ, पोलीस बांधवांवर केलेले हल्ले...असे कितीतरी बेशिस्त पराक्रम ऐन संकटकाळातदेखील आपण नोंदवून ठेवलेत. पण आता या टप्प्यावर आलोच आहोत तर काही गोष्टीचे धडे घ्यायला हरकत नसावी. कारण आपण कितीही बुद्धिवादी आणि विज्ञानवादी असलो तरी कोरोना सारख्या एका अदृश्य विषाणूने आपल्याला चालताबोलता बंदीस्त केलंय. अगदीच स्पष्ट बोलायचं तर या घडीला आपण निसर्गाच्यासमोर पराभूत आहोत, हे मान्यच करायला हवं. ज्या मानवतेच्या नावाने आपण एकमेकांना व्याख्याने ऐकवत आलोत तीच मानवता आज आपली आतुरतेने वाट बघते आहे. यानिमित्ताने निसर्ग खूप काही शिकवू पाहतोय आपण एकजुटीने त्याला शरण जाण्याची गरज आहे.       शेवटी काही माणसांचे आभार देखील मानायला हवेत. ही याच समाजाची दुसरी पण भक्कम बाजू आहे. ही माणसं नसती तर आपला समाज कधीच कोसळला असता. पण या देवदूतांनी अनेकांचे प्राण वाचवले. पोलीस, पत्रकार, डॉक्टर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठलीच परवानगी नसतानाही जीव धोक्यात घालून भुकेलेल्या जीवांना घास भरवण्यासाठी पुढे आलेले स्वयंसेवक. ही प्रेरणा आहे, ही संवेदना आहे, ही जाणीव आहे..आणि ही चार दोन देवदुतांसारखी माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच या समाजाचं अस्तित्व टिकून राहील असं म्हणायला हरकत नाही. बाकी वेळेचा, काळाचा कुठलाही भरोसा आता उरलेला नाही. निसर्ग जितकं रौद्र रूप धारण करतोय तितकीच आपली काळजी देखील घेतो आहे. पण हे नेहमी होईलच असं नाही. त्याच्या नजरेत आपण फक्त एक सजीव आहोत. आपली भूमिका इतर सजीवाच्या तुलनेत श्रेष्ठ असेल तर नक्कीच उत्तम, परंतु ती चुकीची ठरू नये. काहीतरी महत्वाचा संदेश निसर्ग नोंदवू पाहतोय. परंतु आपण अजूनही जागे होत नाहीय. त्याला संपवायचंच असतं तर कोणतंही प्रलय सहज शक्य होतं. परंतु केवळ मानव जातीचाच हस्तक्षेप वाढलाय इतकाच संदेश देवू पाहतोय निसर्ग. कारण कोरोना सारख्या विषाणूने गेले काही दिवस सगळं जग बंद ठेवलं परंतु ते केवळ माणसांपुरतच. बाकी सारे प्राणी, पक्षी आहे तसेच जगतायत...बंदिस्तआपण आहोत जे स्वताला मुक्त समजतात.एका अर्थाने कोरोना सारखे कितीतरी अदृश्य विषाणू आपल्या मनात साचलेले असतील. त्यांना हटवून एकमेकांसाठी आपलं जगणं सॅनिटाईजकरण्याची हीच वेळ आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस हेच स्वप्न बघतोय... खरंच जगणं सॅनिटाईज करता आलं तर ? मनातले राग, लोभ, सूड, द्वेष हे सारं निखळून पडेल आणि सगळं जग निरागस होईल !       पुन्हा इतकंच म्हणेन, वेळ कठीण असली तरीही अजून फार काही घडलेलं नाही. आपण प्रत्येकाने आपल्यापुरती आपली बाग जपायचीय...पुन्हा सारं हिरवं होईल...यात शंका नाही.