बालपणात आईसोबत हट्ट धरून रानात जायचो तेव्हाही भेटायचा हा अवखळ पाऊस...
बेफाम कोसळायचा झाडांच्या सळसळत्या पानांतून;
मातीच्या मऊसर त्वचेवरून खळखळत धावायचा हा पाऊस ..
दप्तर घेऊन निघालं की,
शाळेच्या वाटेवरही भेटायचा हा कलंदर दोस्त !
होळीचे रंग खेळावे तसा भिजवायचा आम्हाला हा मस्तीखोर पाऊस ..
नंतर - कॉलेजच्या कट्ट्यावर 'ती'ला चोरून पाहतानाही
हलकेच तिच्या गालांवरून घसरत यायचा हा खट्याळ पाऊस..
पाऊस वहायचा तेव्हा ...
आईच्या भिजलेल्या काळजातून ..
बाबांच्या फाटक्या सदऱ्यातूनही .
अगदी,छपरात निजलेल्या आजीच्या 'दुलई'लाही ऊब देऊन जायचा हा जिवलग..
पाखरांची किलबिल ऐकून दिवसाकाठी थोडं थबकायचा बिचारा;
पुन्हा रात्री बेफाम कोसळायचा - रानात तसा मनातही ...!
आजही कित्येक वर्षांनी पुन्हा भेटतोय हा चंचल, उनाड भिजपाऊस..
तसाच आहे अगदी बालपणातल्या दोस्तासारखा
- निरागस पण मिश्किल हसतो ..
- निरागस पण मिश्किल हसतो ..
मी लेक्चर देत असताना खेळत असतो हा खिडकीबाहेर...
आवर्जून हाक देतो मलाही ...पण त्याला माहित नाही माझी व्यथा ..
आता मी त्याच्यासारखा दिलखुलास नाही बागडू शकत;
मी अडकलोय कुठेतरी "डिजिटल" जगात...
तो आजही भेटतो..
ए.टी.एम.च्या रांगेत, कधी मुंबईतल्या गर्दीनं तुडुंब भरलेल्या पुलावर...
पण; गुदमरलेला जीव सांभाळत "बुलेट ट्रेन"च स्वप्न पाहताना
त्याला साद देणं राहूनच जातं ...
तरीही तो अलगद हसतो पाहिल्यासारखाच ..
कसं सांगू त्याला -?
- आता आम्हाला 'भाकरी' सुद्धा 'ऑनलाईन' झालीय
खूपच धावतोय मी, पण पोहचतच नाहीय कुठेच..
तो मात्र रेंगाळत राहतो..मातीच्या .....माणसाच्या अंत:करणापर्यंत ...
"पाऊस अजूनही भेटतो"...आईच्या भिजलेल्या काळजातून...
कृष्णा बेलगांवकर
2 comments:
hii
मस्तच..
Post a Comment