Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Sunday, 26 May 2019

उषा:काल होता होता...




परीक्षेचं भीषण वास्तव 

कृष्णा बेलगांवकर
२०.०५.२०१९

काही दिवसांपूर्वी एका महिला प्राध्यापिकेसोबत माझी सडेतोड शाब्दिक खडाजंगी झाली होती. एक्झाम चालू असताना क्लासरूममध्ये पूर्ण गोंगाट सूरु होता, सगळी मुलं वर्गात कोणीच नसल्यासारखं प्रचंड बडबड करून, गप्पा करत पेपर लिहीत होती. इथपर्यंत ठिक, पण वर्गाच्या मध्यभागी बसलेली एक मुलगी शरीराच्या नकोनको त्या भागातून कॉपी काढून (सगळे बघत असताना) लिहीत होती, त्याच कॉपीज ती शेजारच्या मुलांनाही पूरवीत होती. आणि हे सगळं चालू असतानाही या प्राध्यापक महाशय मात्र निवांत हे सार बघत होत्या. न राहून मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी अगदीच उंच स्वरात आवाज करून मला भलतंच उत्तर देण्याचा प्रयत्न केला. नंतर माझाही पारा चढला आणि मीही मोठ्याने बोलायला सुरु केलं. शेवटी एका क्षणी त्यांनी विशिष्ट शब्द वापरून माझा अपमान केला आणि परीक्षार्थी चाहत्यांची वाहवा मिळवली. नंतर मलाच खूप अपराधी वाटलं. माझा अपमान झाल्यामुळे वर्गात प्रचंड हशा पिकला होता. कारण विद्यार्थानाही असेच सुपरव्हायझर हवे असतात. पुढे मी शांत बसलो. अर्थात म्याडमचा आवाज पुन्हा माझ्यावर वाढला त्या क्षणी मीही स्वतः  प्राध्यापक असल्याचं सांगितलं. त्यावर त्यांनी मला आजारी असल्या कारणामुळे ब्लॉक कंट्रोल होत नसल्याचं सांगितलं. दरम्यान माझा  वर्गात अपमान झाल्यामुळे मीही प्रचंड संतापलो होतो. संबंधित महिला प्राध्यापकांना मदतीसाठी शेजारच्या ब्लॉकवरील प्राध्यापक आले त्यांनी इंग्लिश सुरु केलं मग मीही त्यांना इंग्लिश मधुनच interact झालो. नंतर त्या दोघांनी समझोता करून मला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मी त्यांना इतकंच सांगितलं...  - अगदीच वाह्यात नाहीत ही मुलं. सांगितलं तर ऐकतील. पण तुम्ही सांगण्याची तसदीदेखील घेत नाही? आणि वरून चर्चा ऐकायला मिळते आजकाल मुला-मुलींनी कॉपी करण्याचं प्रमाण वाढलं. का बदनाम करता मुलांना तुम्ही? पहिली गोष्ट एखाद्या मुलाचं ओळखपत्र किंवा प्रवेशपत्र विसरलं तर अर्धा - एक तास त्याला आत सोडत नाहीत तुम्ही. इतका कडक असल्याचा देखावा करणारे तुम्ही स्वतः असे कसे गाफिलपणे तेही परीक्षा चालू असलेल्या वर्गात कसे फिरू शकता? नियम फक्त मुलांसाठी नाहीत, ते तुमच्यासाठी देखील आहेत. मी सुरुवातीला अगदी सहज विचारलं तुम्हाला - वर्ग का कंट्रोल होत नाही? तर यावर तुम्हीही शांततेत बोलू शकत होता पण तुमचा इगो दुखावला गेला म्हणून तुम्ही माझ्यावर भडकला मॅडम. माझं तुमच्याशी वैयक्तिक काहीही वैर नाही, मग तुम्ही का माझ्याशी ते पत्करावं
    संबंधित घटना घडल्यानंतर मी बराच अस्वस्थ होतो. केवळ या एकाच घटनेनं नाही तर गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात असे कित्येक अनुभव घेतले मी. स्वतः सुपरव्हिजन करत असताना कित्येक वेळा मी मुलांचा रोष पत्करलेला आहे. अनेकदा एखाद्या मुलाची कॉपी पकडल्यामुळे त्याला बाहेर हुसकून दिलं की आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने जेष्ठ  असलेल्या प्राध्यापकानी त्या मुलाला पुन्हा वर्गात आणून बसवलं आहे. अर्थातच त्यामुळे त्या मुलाच्या मनात मी खूप वाईट आणि तो प्राध्यापक खूप चांगला, असा समज निर्माण होतो आणि मग तो माझ्यासारख्याला शिव्या देत सुटतो. पण म्हणून त्या दमदाटीला घाबरून असं चुकीचं कल्चर रुजू देणं कितपत योग्य  वाटतं तुम्हाला? तुम्ही याला विरोध करत नाही ही पहिली चूक आणि यदाकदाचित तुम्ही केलाच तर तुमच्यात(प्राध्यापक) एकी होत नाही ही दुसरी चूक. म्हणून काहीच बोटावर मोजण्याइतके प्रामाणिक सेवक राहिले आणि  दुर्दैवाने तेच या व्यवस्थेचे बळी ठरत आहेत. 
         दुसऱ्या बाजूने मी मुलांचं समर्थन करून ती खूपच चांगली आहेत असं मुळीच म्हणणार नाही. नालायकपणाची कीड भरमसाठ वाढीस लागली आहे. मागे एकदा (3/4 वर्षांपूर्वी) माझ्या एक सहकारी जेष्ठ प्राध्यापिका, त्यांनी एका मुलाची कॉपी हिसकावून त्याला बाहेर काढलं. तर जाताना त्या मॅडमला ऐकायला लाज वाटेल अशी अर्वाच्च शिवी देऊन तो मुलगा तेथून निघून गेला. माझा एक प्राध्यापक मित्र आणि मी दोघांनी त्याला अडवलं तर आम्हालाही दम देऊन धमकावून तो पुढे गेला. वास्तवात तेव्हाही बाकीचे सगळे सहकारी एकत्र येऊन त्याला दोन मुस्कटात देऊ शकत होते पण तरीही मात्र तो आरामात हिरोसारखा शर्टचे बटन काढून छाती दाखवत निघून गेला. आजची मुलं सैराट झालीत, कोणाचंच ऐकत नाहीत असं म्हणून त्यांना पाठीशी घालण्याचे असे डाव तुम्ही कुठवर खेळणार आहात
        मला माहितीय की हे सत्य असं कडवटपणाने मांडतो म्हणून मला अनेकांच्या टीकेला सामोरं जावं लागणार आहे. पण आता मी असाही घायाळ झालोचय तर एकएक करत सगळीच सत्य ऐका. तूर्तास हा लेख मर्यादित आहे. मी कोणत्याही सिस्टिम किंवा व्यक्तीचा नामोल्लेख करणं टाळलं आहे. कारण मला  वैयक्तिक कोणाचाही द्वेष नाही. हो मात्र जे कोणी असं वागत असतील त्यांना मिरच्या झोंबल्याशिवाय राहणार नाही, थोडी आग नक्की होईल पण त्यांनी चिंतन करावं हाच यामागचा स्पष्ट हेतू आहे. कारण बहुतांश मुलं मोठ्या घरातली असली आणि टाईमपास म्हणून प्रतिष्ठेसाठी शिकत असली तरी अजूनही या समाजात पोटाला चिमटा लावून घास घास मिळण्यासाठी संघर्ष करत शिकणारी पोरंही आहेत. दुर्दैवाने त्यांचं प्रमाण कमी झालंय पण मला त्यांची कणव जास्त वाटते. रात्रभर मित्राच्या लग्नात दारू पिऊन नाचणाऱ्या पोरांसाठी कॉपी करून पास होणं हा पर्याय होऊ शकतो पण स्वाभिमानाने कष्ट करून शिकणाऱ्या पोराला हे कधीच जमणार नाही याची तुम्हीही जाणीव ठेवा.  
असोमागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या त्या घटनेनंतर त्याच महिला प्राध्यापिका आज एका ब्लॉकवर सुपरव्हिजन करताना दिसल्या पण खूप शांतता होती आणि त्या शांततेचं समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.. मला माहितीय सगळी सिस्टिम आपण एकटे नाही बदलू शकत पण आपल्यापुरतं एक पाऊल जरी आपण प्रामाणिकपणाने टाकलं तर त्यातून काही अंशी तरी बदल घडेल...
      या घडीला रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता आठवते...आशय खूप सुंदर आहे - सूर्य अस्ताला निघाला आहे आणि निघताना त्याला प्रश्न पडला की, मी मावळतीला गेल्यानंतर या जगात अंधार होऊ नये म्हणून कोण काम करेल? त्याचा हा सवाल ऐकून तारे सुन्न होऊन  मान हलवतात, आम्ही तर आमच्यापुरता प्रकाश देणारे आम्ही जगभर कसा उजेड देऊ? चंद्र बोलतो मीही मर्यादितच, चांदणं बोलतं आम्ही तर केवळ सुंदरतेसाठी लखलखतो जगाला कसा पुरणार हा प्रकाश... ग्रह, तारे, चंद्र, चांदणे या सगळ्यांची ही उत्तरं ऐकून सूर्य हवालदिल होतो तितक्यात दूरवर दिसणाऱ्या एका झोपडीतला मिणमिणणारा दिवा सूर्याकडे येतो आणि बोलू लागतो - हे सूर्यदेवातू तर प्रकाशाचा अगम्य दाता आहेस. तुझ्यापूढे माझं अस्तित्व तरी कितीसं? त्यामुळे या जगाला पुरेल इतका प्रकाश मी देईल न देईल पण एक नक्की सांगतो, माझ्या काळजात तेल असे पर्यंत जगातल्या प्रत्येक झोपडीचा कोनाडा मी उजळीत ठेवील.... !
      बस ! या दिव्याच्या काळजातलं तेल आटू द्यायचं नाहीय यासाठी ही धडपड... अगदी काहीच नसण्यापेक्षा काही अंशात का होईना काहीतरी चांगलं घडेल यावर माझा दृढ विश्वास आहे.... 

                                                                                               
                                                                                                    कृष्णा बेलगांवकर