
एखाद्या नेत्याने केलेल्या भाषणावर इतकं उतावीळ
होण्यापेक्षा शेतीच्या बांधावर उभा असलेल्या आपल्या बापाच्या हाकेला साद द्या. बस
काही कमी पडणार नाही. शेतकऱ्याच्या पोरांना आपल्या बापाची काळजी वाटायला हवी, मुख्यमंत्र्याची नाही. कारण शेवटी आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर येते, नेत्यांवर कधीच नाही येत. नेत्यांचं पक्ष बदलणं, धरसोड करणं सुरूच राहील. आपल्याला वाली आपणच आहोत, हे विसरू नका. आपणच त्यांचे झालो तर आपलं कोण उरणार? सत्ता बदलाची चिंता राजकारण्यांना वाटायला हवी, सामान्य जनतेला नाही.
कृष्णा बेलगांवकर l 04 November 2019
-------------------------------------------------------------------------------------------------------
काल परवा एका शेतात कापूस वेचताना वेगळी माणसं दिसली. वेगळी
म्हणजे शेतकरी तर वाटत नव्हती. शेजारच्या माणसाकडे चौकशी केली तेव्हा समजलं हे
बिहारी लोक आहेत. मुस्कटात बसावी तसा भानावर आलो. काही वर्षांपूर्वी बिहार मधून रेल्वेत
बसलेलील ही माणसं मुंबईतील रस्त्यावरील गाडे, हॉटेल, कंपन्या आणि नंतर छोटीमोठी
कारागिराची कामे करत चहा भज्याच्या कॅन्टीनसहित आता थेट आपल्या गावखेड्यातल्या
शेतीच्या बांधावर येऊन पोहोचली. भानावर येण्याचं कारण असं की काही दिवसांपूर्वी
शेतीसाठी कोणी मजूर मिळत नाहीत, असं माझ्या वडिलांकडून ऐकलं होतं. आज ही टोळी दिसली आणि मग समजलं आपल्याकडे
मजूर नाहीत असं नाहीय; तर नव्या पिढीची काम करण्याची तयारी संपलीय. थोडसं वाईट वाटेल पण, आज शेतकऱ्यांच्या
मुलांना शेतीचं काहीच आकर्षणही उरलं नाहीय, हे प्रकर्शान जाणवतं. बरं शेती सोडाच; पण
उद्योग व्यवसायामध्येही फार म्हणावी तशी नाहीत आपली पोरं. आणि नोकऱ्या तर मिळतच
नाहीयत. मग आहे कुठे ही सगळी गर्दी? तर यातली बहुतांशी पोरं राजकारणाकडे वळली आहेत
आणि राजकारणी मंडळी यांचा पुरेपूर वापर करून घेत आहेत, हेच आजचं कटू वास्तव आहे. अर्थात
काही तरुण शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतीचा विकास करत आहेत अशीही उदाहरणे आहेतच.
त्यांचा खरोखर आदर्श घेतला गेला पाहिजे. पण जास्त करून आजची मुले राजकारणाकडे वळली
आहेत. आपला व्यवसाय राजकारण नसून शेती आहे, हे सांगण्यासाठी माझा हा अट्टहास आहे.
हा
लेख कोणी शेतकऱ्यांची पोरं वाचत असतील तर निट डोळ्यात अंजन घालून वाचा –
निवडणूक संपली. निकालही लागलेत, खरं तर फक्त
मतदान करेपर्यंतच तुमची गरज होती. पण तरीही आपला माणूस म्हणून तुम्ही प्रचार
करण्यापासून थेट निवडून आल्यावर गुलाल उधळेपर्यंत आमदाराच्या सोबत राहिलात. या
नेत्यांना निवडून देण्यात तुमची भूमिका मोठी आहे. पण हेही लक्षात ठेवा निवडून तो
आला, आमदार तो झाला मग तुम्ही का गावभर गुलाल उधळीत फिरता ? आपला बाप शेतीच्या
बांधावर भिजत उभा आहे हे लक्षात असुद्या. बाजरीला कोंब फुटले, कापूस भिजून मातीत
लोळतोय. आपली ओळख गुलाल नसून मातीच आहे हेही स्वतःला सांगा एकदा.
मला निवडणुका,
राजकारण किंवा सत्तांतर या गोष्टींवर बोलायचं नाहीय. तसंच एखाद्या परिस्थितीसाठी सरकारला दोष द्यावा कि देऊ नये, याबद्दलही मला वाद
घालायचा नाहीय. परंतु आज शहरात असलेला मीही एका सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे, म्हणून जीव तुटतोय. वाईट वाटतं खूप. सरकारचं नाही, आपलं वाईट वाटतं. कारण आजचीच गोष्ट बघा
ना, अतिवृष्टीमुळे झालेल्या
पिकांच्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करावा, असे
जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि विभागाला आदेश देऊन आठ दिवस संपले तरीही त्याबद्दल फारशी कार्यवाही झाल्याचे दिसले नाही. वाईट
त्यापेक्षा याचं वाटतं की याबद्दल कोणीच काही पाऊल उचलत नाही. कारण सगळ्यांना सरकार कोणाचं येणार? याची चिंता पडलीय. बरं जास्त दु:ख या गोष्टीचं वाटतं की आपल्या शेतकर्याची पोरंही सध्या याच
चिंतेत आहेत की मुख्यमंत्री कोण होणार? नाही मी
त्यांच्यावर टिका करत नाहीय, जे दिसतं ते सत्य बोलतोय. पावसाच्या सावटात
सापडलेल्या शेतीमालाचा उरला सुरला घास शेतात पडला तोही ध्यानात येत नाही. एखाद्या
नेत्याने केलेल्या भाषणावर इतकं उतावीळ होण्यापेक्षा शेतीच्या बांधावर उभा
असलेल्या आपल्या बापाच्या हाकेला साद द्या. बस काही कमी पडणार नाही. शेतकऱ्याच्या
पोरांना आपल्या बापाची काळजी वाटायला हवी, मुख्यमंत्र्याची नाही. कारण शेवटी
आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर येते,
नेत्यांवर कधीच नाही येत. नेत्यांचं पक्ष बदलणं, धरसोड करणं
सुरूच राहील. आपल्याला वाली आपणच आहोत, हे
विसरू नका. आपणच त्यांचे झालो तर आपलं कोण उरणार? सत्ता बदलाची
चिंता राजकारण्यांना वाटायला हवी, सामान्य जनतेला नाही. उद्या
मुख्यमंत्री कोणीही झाला तरी तो तुम्हाला दिवाळीचं फराळ करायला घरी बोलावणार नाही.
तो त्याचं पुढच्या पाच वर्षाचं नियोजन करेल. आपण आपल्या एका घासाचा विचार करायला हवा.
ही
वेळ खरंच चिंतनाची आहे. मागील काही दिवस पाऊस पडत नाही म्हणून शेतकर्यांनि
आत्महत्या केल्या आणि आता पाऊस जास्त पडतो म्हणून पुन्हा तीच वेळ येतेय. बरं
आत्महत्या करून प्रश्न सुटत तर नाहीच उलट त्यातून नवं राजकरण जन्माला येतं. आत्महत्येचं
खरं कारण फक्त ती करणाऱ्याला माहित असतं, बाकी आपण सगळे नुसते अंदाज आणि अर्थ
लावत असतो सोयीनुसार, परिस्थितीनुसार आणि कदाचित गरजेनुसारही. आणि खरोखरच एखाद्याने आत्महत्या केली म्हणून त्याच्या काळ्जीस्तव हजारो लोक
एकत्र येऊन एखादं आंदोलन उभं करत असतील तर,
प्रश्न पडतो इतकी काळजी करणाऱ्या या समाजात आत्महत्या होतातच कशा? मग आपण सरळ सरळ हे का मान्य करत नाही
की फक्त वेठीस धरले जाणारे नेते आणि सरकारच
याला कारणीभूत नाही; तर आपण सामान्य माणसंसुद्धा या गोष्टीला तितकेच जबाबदार
आहोत. कारण आत्महत्या करणाराची व्यथा तुम्ही आम्ही
कोण कसे सांगणार? त्याला नेहमी कर्जमुक्तीच हवी असेल असं कशावरून ठरवता तुम्ही? काळ
बदललाय खूप. फक्त पैशांसाठी किंवा पैशांपोटी नाही आत्महत्या करत प्रत्येकजण. कर्जबाजारीपण
हे एक निमित्त असतं. पण कारणं अजून असतात. दुष्काळाने होरपळून निघालेल्या माणसाला
कुटुंबातील प्रत्येकाची सोबत हवी असते. निसर्गाने तर कधीच साथ सोडली शेतकऱ्याची,
पण माणूस म्हणून आपण नाही सोडली पाहिजे. मग नाही आत्महत्या करणार कोणीच. जुन्या
पिढीतले कोणी आजी आजोबा असतील तर त्यांना विचारून बघा १९७२ चा दुष्काळ कसा होता ?
मी अनेकदा ऐकलं त्याबद्दल. आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात दाहक होता तो. निसर्ग
पूर्णच कोपला होता. गावच्या गावं ओसाड झाली होती. प्यायला पाणी उरलं नव्हतं. बैल
गाड्या जुंपून शेजारील गावांना पिण्याचं पाणी शोधायचे लोक. अन्न मिळवणं तर खूप
कठीण होतं. पण त्याही काळात जगलीत माणसं ! घास घास वाटून खाल्ला. मिळतील ती कामे
शोधत जनावरं घेऊन मिळेल त्या दिशांना स्थलांतरीत झाली बरीच. पण त्यांनी ना राजकारण
केलं ना आत्महत्या..! संत कबीर यांनी एका दोह्यात म्हटलंय –
जब अकाल पडे अनाज का तो
इन्सान मर जाता है l लेकीन जब अकाल पडे विचारो का तब इन्सानियत मर जाती है l
आज दोन्हीही संकटात आहे. माणूस आणि
माणुसकीसुद्धा ! राजकारणाने आपापसात आणि कुटुंबातील नात्यांमध्ये सुद्धा किती विष
पेरलंय, हे आता कळेलच हळूहळू. कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी केलेल्या भांडणात एकमेकांवर
सूड उगवलेत आणि नेत्यांनी पक्ष पद्ळून एकमेकांशी हात मिळवणी केली. हेही विषच आहे. मात्र हे आम्हाला कळत नाही, ही त्यावरून मोठी शोकांतिका
! अलीकडील काही वर्षांत तरुण मुलांचा राजकारणातील रस वाढल्याचे दिसून येत आहे.
मात्र त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. आहे त्याच ठराविक राजकीय घराण्यातील
पुढची पिढी समोर येतेय, अन आपली पोरं प्रचार करण्यात आणि गुलाल उधळण्यातच धन्यता
मानतात. हा खोटा अट्टहास कशासाठी ? आपण जर राजकारणासाठी असे बाहेर फिरत राहिलो
तर शेतातली कामं कोण करणार? आज रोजगाराच्या निमित्ताने का होईना कुठलं तरी रान
या बिहारी लोकांनी काबीज केलंय हे विसरू नका. उद्या कदाचित ते महाराष्ट्रात
शेती विकत घेऊन पिक घेऊ लागतील आणि मग काम शोधत तुम्हाला त्यांच्याकडे याचना करावी
लागेल, कारण काळ कोणाला माफ करत नाही. अजूनही वेळ गेली नाही....तुम्ही ठरवा...!
कृष्णा
बेलगांवकर
No comments:
Post a Comment