Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Sunday, 19 April 2015

आठवणींच्या प्रदेशात....!

दैनिक लोकमत, 20 एप्रिल 2015

'संपल्या एकदाच्या एक्झाम्स'..म्हणत कोणीतरी आनंदानं सुस्कारा सोडला असेल...अन इतक्यातच आणखी एक जाणीव होऊन काळीज धडधडायला लागलं असेल - संपलं यार कॉलेज सुद्धा ! 

दोस्तांनो, बऱ्याच दिवसांनंतर लिहितोय काहीतरी खास, तुमच्यासाठी, अन तेही तुमच्या काळजाला हात घालतोय तुमचाच विषय घेऊन..मावळत्या कॉलेज लाईफचा !
... आठवतो ना पहिला दिवस! ग्रीष्म बेभान होऊन बरसत होता वाटेवर, भोवताली हिरवळ दाटलेली अन कॉलेजचा क्याम्पस सुद्धा तुमच्या हिरवळीनं गजबजून गेलेला... तासंतास रांगेत उभ राहून घेतलेलं Admission अन वाट पाहत पाहत बऱ्याच दिवसांनी सुरु झालेलं कॉलेज ! ते पाहिलं लेक्चर , पहिली ओळख सर्वांशीच. पहिल्या पावसात नव्या मित्रांसोबत खाल्लेला वडापाव..तो चहाचा सुवास – अत्तरापेक्षाही कितीतरी प्रिय वाटणारा...शाळेतली पुस्तकं अन वर्गातल्या शिक्षकांपेक्षाही सारंच कसं नवनवीन, हवं-हवंसं, पण अनामिक हुरहूर लावणारं हे जग...तुम्हाला हेही आठवत असेल दोस्तांनो- क्रिकेट खेळण्यासाठी मिस केलेलं लेक्चर अन मैत्रीणीला बरं वाटावं म्हणून केलेलं कांटाळवाणं practicalही ..कधी एखाद्या सरांची मर्जीखातर ऐकून घेतलेली भाषणबाजी तर कधी सगळ्यांनी मिळून घेतलेला कॉमन ऑफ”सुद्धा....नुसताच अभ्यास करून कंटाळवाणी वाटली असेल परीक्षा म्हणून सगळ्या ग्रुपला चुकवून ‘दोघंच’ तुम्ही गेला असाल पिक्चर बघायला आणि पुन्हा नको यार आपलाही 'रेगे' व्हायला या भीतीने जीव ओतून दोन दिवस अभ्यासही केला असेल.., कधी बेशिस्त उचापतींमुळे वाटला असेल प्रवेशच रद्द करावा.. पण श्रावणातल्या हलक्या सरींनी मनाच्या हिरवळीवर उमललेलं नातं जपण्यासाठी का होईना, एक-एक पाऊल टाकत तुम्ही चालत राहिलात ही सगळी पायवाट..याच प्रवासात..याच दिवसांत जाम चिडला होता तुम्ही - परीक्षेत मिळालेले कमी मार्क्स पाहून...किती हिरमुसला होता - मित्रांनी चोरून केलेल्या पार्टीमुळेही.. कधी तर एखाद्या सरांनी बेताल खरडपट्टी केली तेव्हाही तोल गेला...मित्रांनीच सावरलं तेव्हाही तुम्हाला..इतकंच काय बाबांनी नाकारलेल्या परवानगीमुळे ट्रीपही मिस झाली असेल पण  दोस्तांनो..तरीही कधीच अधुरं नाही तुमचं कॉलेज लाईफ!        
   आज या सगळ्याच गोष्टींनी फार गजबजून जाईल तुमचं मन..हेलावणारं..थोडं सतावणारं दुःखही होईल त्याला, पण आठवून पहा उद्या..ही कट्ट्यावरची मस्ती अन सर्वांनी मिळून केलेला अभ्यास.. मैत्रिणीशी झालेलं भांडण अन मित्रांचं हेव्यान चिडवणं..रिमझिम पावसात गुण-गुणलेली निरागस कविता...अन या रंगीन दुनियेत ओसंडून वाहिलेला बेफाम पाऊस..मुलींच्या घोळक्यासमोरून सेक्युरिटीने हाकललं म्हणून मनात उठलेलं वादळही आठवा..अन आठवा जर्नलच्या उजव्या कोपर्यात बोलक्या सरांची असलेली अबोल सही...! उद्या जगभर बक्खळ पैसा कामवाल, पण हे श्रीमंत क्षण नसतील सोबतीला ...मग आठवतील इथले शब्द..बंगल्याच्या मनोर्यात थंडगार हवेशी बांधलेला झुलाही इतकी निरागस स्वप्नांची दुनिया नाही दाखवू शकत... नोकरी करताना शेजारचा सहकारी सुद्धा जेवायला हाक देणार नाही तेव्हा आठवेन - मित्रांशी भांडून खाल्लेला वडा-पाव....! बिच्चारे मित्र भलेही भांडले असतील कितीदा , पण उद्या आईला हॉस्पिटलला नेण्याची वेळ आली तर तेच आधी हजर राहतील...दोस्तांनो तुमच्या आयुष्यात सगळेच तुम्हाला नाकारतील तेव्हा अलगद उघडा कोलेजची ब्याग...वर्षानुवर्षापूर्वीचं मैत्रीणीने लिहिलेलं पत्र हाताशी येईल अन क्षणात तरळेल डोळ्यांत लाखमोलाचं पाणी..! ब्यागेच्या तळाशी सापडेल कोलेजातल्या आठवणींचा अल्बम, ते एकत्रित काढलेले फोटो..तेव्हा दिसेल एकमेकांच्या शेजारी उभे राहतानाही इतके बुजणारे आपण, काळजाशी मात्र घट्ट बांधले गेलो होतो! पुन्हा डबडबल्या डोळ्यांनी पाहाल तेव्हा दिसेल आठवणींच्या धुसर प्रदेशात दडून बसलेलं कॉलेज..अन आयुष्याच्या मध्यान्ह उजेडात निळ्या खडकावर रुतलेलं वैभवशाली हे जीवन ! आज इथलं जग सोडताना भलंही ऊन दाटलं असेल तुमच्या भोवताली; पण या हिरव्या दिवसांत पेरलेली स्वप्ने तुमच्या मनातून कधीही हरवू देऊ नका इतकंच...! 
                                                                                                
                                                                                                 - कृष्णा बेलगांवकर 


No comments: