Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Monday, 14 July 2014

विरत गेलेली चाहूल....

                                                                                        Dainik Ganvkari, Nasik May 2010.

     फार अस्वस्थ  वाटतंय, ढगाळलेल्या वातावरणात वादळ सुटलं कि असंच वाटतं. खरं तर याच वातावरणात लहानपणी खूप मौज वाटायची, आज मात्र हूर हूर वाटते. घडून गेलेल्या अन अर्धवट घडलेल्या  घटना, भेटलेली माणसं, जिवलग दोस्त आणि चाहते सुद्धा... डोळ्यांसमोरून तरळून जातात. आई-बाबा अन भावंडही दिसतात. लहानपणातल्या  माझ्या खोडकरपणाला काठीचा धाक दाखवणारी आजीही दिसून जाते.. अंगाई गाणा-या आईचा कंठ दाटून आल्यासारखा वाटतो.., तर लपंडाव खेळताना अंगणात धावणारे आम्ही पोरंही नकळत दिसून जातो...तेव्हा खेळता खेळता दिवसभराचा एक तास झाल्यासारखा वाटायचा, आता एकच तास दिवस भराहून मोठा वाटतो. सर्वांच्या आठवणीने व्याकुळ करून सोडणारी ही वेळ संपत का नाही लवकर ? म्हणून मी उगाच एका टेकडीवर मावळत्या सूर्याच्या उन्हाचा आस्वाद घेत बसलोय.. 
      आज तब्बल आठ वर्षांनंतरचा मायभूमीतला  सूर्यास्त मी पाहतोय. नेमके सायंकाळ म्हणावं की कातरवेळ ? या विचारांतच मी अस्वस्थ आहे. ते अल्लडपणाचे दिवस कधीच संपलेत. अर्ध्या तपात महाराष्ट्रातली बहुतांशी ठिकाणं फिरून झाली..पण; इतक्या दिवसांत असा सूर्यास्त एकही पाहायला मिळाला नाही. जे पाहिलं ते मोहात पाडणारं अन कित्तेकदा तर सोडूच नये असं वाटणारं होतं. खरच काहीसा वादळी वाटणारा आजचा हा सूर्यास्त वंदनीय आहे...चला पाहता पाहता  आठवणींचा एक पट डोळ्यांसमोरून तरळून गेला. भोवतालच्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला. ढग भरून आलंय...ज्या सुर्यास्ताबद्दल मी बोलत होतो..तो कधीच ढगाआड गेला; पण मावळला नसेल अजून. गावाच्या उत्तरेला गोदावरी नदी आहे, त्या बाजूने वादळाने जोर धरला. गवताचे ओझे चा-याच्या पेंढ्या डोक्यावर घेऊन घराकडे परतणारे वादळाशी झुंज देऊ लागले. अचानक पाऊस येतो की काय? या भीतीने काहींची आवरा-आवर सुरु झाली. मोठ्यांना वादळात होणा-या नुकसानीची धास्ती तर लहानग्यांना ऊन जाऊन सावलीत खेळायला मिळाल्याचा आनंद... गावाच्या पूर्वेकडून गायी-म्हशींचा मोठा कळप गावाकडे परतताना दिसतो. त्यातच काही शेळ्यांचं ओरडणं सायंकाळच्या अस्वस्थतेत भर घालीत मनाला डिवचून जातं. दूरवर  कोठेतरी एक आई आपल्या लाडक्याला हाक मारते, इतक्यात नळाला पाणी आलंय. चार-दोन म्हाता-यांसोबत पोरांची नळावर जमलेली गर्दी-अशांततेत आणखी भर! गावाच्या मध्यभागी एका पडक्या इमारतीजवळ दोन पोरं चोरून सिगारेटचा झुरका मारतात. समोरच्या उंच, थोरल्या पिंपळाच्या झाडावर एक घरटं आनंदानं डोलतंय..'आता कोसळायचंच  तर दुख मानून काय घेणार?, तेव्हा आनंदातच कोसळू या.' असंच कदाचित ते म्हणत असेल.पण पक्षी मात्र बेफिकीर, बिनधास्त. पक्षीच काय त्यांची घरटीही आता शौर्य दाखवायला लागली..म्हणून वाटतं - 'पक्षी उडतात ते बुलंद झेप घेऊनच..मागे कधी परतायचं याचा ते विचार करीत नाहीत, कारण त्यांचा विश्वास असतो आपल्या पंखांवर आणि त्यांच्यात असते जिद्द..प्रत्येक फांदीवर, प्रत्येक झाडावर..नवं घरटं उभारण्याची!' खरंच किती श्रीमंत आहे हा निसर्ग! आपलं उदात्त वैभव उधळून देतानाच त्याची निर्मितीही त्याने त्यातूनच साधलेली असते..अन पाखरं तरी कशी, आपला सोबती म्हणून निसर्गाला सारं काही माफ करीत ते पुन्हा मैलोनमैल भटकत असतात... छे! क्षितिजात विहार करतानाच त्यांचं मन क्षितीजाहून मोठं झालेलं असतं.
     दोस्तांनो..,वादळ आनं अन गेलंही.... या वादळात मातीचा कण अन कण सामील झाला. त्याला पाहून 'हेच वादळ आगामी मान्सूनची चाहूल तर नसेल ना!'  असं वाटल्यानं  बळीराजा थोडा गहिवरला, थोडा सुखावलाही असेल;..पाहता पाहता आकाशाच्या कडा काळोखात विरघळल्या..सायंकाळ की कातरवेळ हे समजण्याआधीच ती वेळ पश्चिम क्षितिजावर निद्रिस्त झाली....!

No comments: