दैनिक लोकमत, 31.08.15
खरं आहे तुझं तू काही वचन देवून नव्हतास गेला आम्हाला की, तू लवकर येशील म्हणून न की आश्वासन दिलं होतंस तू. पण तरीही तू येशिल म्हणून होता नव्हता सगळा चारा बैलांना चारून इथल्या बळीराजानं औतं जूंपली होती..दाटुन आलेल्या ढगांना पाहून मोरांनीही नाचण्याची तयारी सुरु केली..लहान पोरंही आज - उद्या येशिल म्हणत उगाच बागडायची अंगणात;अन् पाखरं तर तूझ्या येण्यानं घरटी उध्वस्त होण्याची वाट पाहत होती..पण तू आलाच नाहीस! किमान काळ्याकूट्ट दाटलेल्या ढगांतून डोकावून तरी पहायचं होतस् तू..अरे या मातीची सारी धूळ होत उडून चाललीय बिचारी...तिची अल्लड बाळं सैरावैरा धावायला लागली..धास्तावलीत सगळी..! तू आजपर्यंत असं कधीच वागला नव्हतास,उशिरा का होईना पण यायचास तू. म्हणूनच यावेळी अगदी श्रावण सुरु होईपर्यंत वाट पहिली तूझी..नकळत दोन दिवसांपूर्वी काही ठिकाणी चार थेंबांनी हजेरी लावलीस पण अगदी राजकारणी करतात तसाच करु लागलास म्हणजे सभेला यायचं अन कुठल्याहि गरजा न भागवता भाषण ठोकून निघून जायचं! जमलं रे बाबा तूलाही. केवळ तूच छळायचं उरलं होतं..घे छळून!
दोन दिवसांपूर्वी तू आलास ना! तेव्हा लेक्चर देत होतो मूलांना. आधीच तूला भेटण्याची उस्तुकता शिगेला पोहोचलेली त्यात तूझी इतक्या दिवसांतली अचानक हजेरी. मग दहा मिनिटं आधीच सोडलं लेक्चर.कारण मलाही भिजायचं होतं अन् पोरांनाही अर्थात तुझ्यासोबत! पण तू काही रमलाच नाहीस नेहमीसारखा. बंदिस्त कैद्यांना प्यारोलवर सोडतात ना तसा लगेच ढगाआड निघून गेलास. तूला महितीय? तूझ्या इतक्याच् येवून जाण्यानं मातीचा किती मोहक सूवास दरवळू लागला होता! पण तू उगाच तरुण पोरानं जबाबदारी झटकत घरातून बाहेर पडावं तसा निघून गेला..हो गेलाच. अरे पावसा, तुझ्या येण्यानं केवळ मातीलाच नाही तर माणसाच्या मनाला देखील अंकुर फुटतात;कळत कसं नाही रे तूला? हल्ली बघ कशी तूसडयासारखी वागू लागलीत ही माणसं!
तूला माहितीय तू नाही आलास तर काय होईल या धरतीचं? मला तर वाटतं जळालेल्या भाकरीचा खरपुस वास सुटतो तसच काहीतरी विचित्र पहायला मिळेल! अजून तरी गुण्यागोविंदानं एकत्र नांदणारी ही माणसं -एकमेकांना खायला उठतील....एरवी तरी एखादाच तलाव जायचा आता सगळं जगच आटून जाईल आणि जलाशयातलं पाणी संपल्यावर मासे तडफडून मरतात ना तशीच अवस्था होईल या जगाची..इतका कसा निष्ठुर झालास रे तू? आपल्याच हाताने रंगवलेलं हे मनोहारी चित्र आज तू स्वतःच फाडू पहतोयस...या शेवटच्या वेळी आम्हाला माफ कर. आम्ही जाणतो की तू नेहमीच प्रसन्न रहावं अशी झाडं नष्ट केलीत आम्ही..इतकंच काय..इथल्या प्रत्येक गोष्टीवर आता केवळ माणूसच हक्क गाजवू लागलाय. आणि हे जग म्हणजे इतर प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या काही उपयोगाचे नसुन ते फक्त इमारती आणि मॉल्स बांधण्याकरिता आहे, असाच गोड गैरसमज आम्ही करुन घेतला. विशेष म्हणजे हे की या धरतीवर माणुसच असा एकमेव प्राणी आहे की, ज्याने स्वतःच स्वतःला बुद्धिमान असल्याचं प्रमाणपत्र दिलंय. कुठल्याही अन्य प्रण्याकडून असं काही ऐकल्याची नोंद नाही. आणि कदाचित यामूळेच असे पराकोटिच्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. नाही वरुणराजा मी फक्त आमच्या झालेल्या चूकांचा खूलासा नाही करत. माफीही मागतोय..आमच्याकडून या निसर्गाच्या होत असलेल्या हेळसांडीबद्दल !! खरं तर तू येत नाहीस हाच आमच्यासाठी फार मोठा धडा आहे. पण नेहमीसारखंच आजही ते आमच्या लक्ष्यातच येत नाही आणि आलं तरीही अमच्यात कधीच एकजूट होत नाही हे आणखी एक कटू सत्य ! पण एक सांगतो राजा....तू पहिल्यासारखं बरसणं सुरु कर..आम्ही दोन हातांनी एक तरी झाड लावू. तूझ्या आगमनानं शेतातल्या हिरव्यागार फांदीवर पाखरांचा खोपा झुलताना पहायचाय..प्रिय पावसा एवढं तरी देशील...!
कृष्णा बेलगांवकर