खूप दिवसांपूर्वी या खोल जलाशयाच्या तळाशी तो
स्वतः चालत गेला. होय चालतच, तेही अगदी सहज. कोणताही जडत्वाचा भाव त्याच्या चेहऱ्यावर
दिसत नव्हता. तसं पाहिलं तर तो फक्त प्रवास होता त्याच्या लेखी ते काही मरण
नव्हतं, नाही आत्महत्या ! बरं समाधी म्हणावी तर तो स्वतःला कोणी योगीही समजत
नव्हता. खरी गोष्ट इतकीच की त्याला काहीतरी शोधायचं होतं; कदाचित या डोहाच्या
तळाशी साचलेलं अंधारयुग ! बाकी तो प्रकाशमान होताच, नाही असं नाही. पण मनातल्या
तळात साचलेला अंधार त्याला अस्वस्थ करत होता. म्हणूनच कदाचित ओंजळीत एक लख्ख दिवा
घेवून तो उतरत गेला या डोहात...चार दोन पायर्यांनंतर तो पूर्ण दिसेनासा
झाला...त्यानंतर पुन्हा तो कधीच दिसला नाही. कदाचित आतापर्यंत तो पोहोचलाही असेल तळाशी..नाही
तो तरंगतही आला नाही वर..कारण तरंगतं ते प्रेत. तो मात्र जिवंत होता आणि जिवंतच
आहे अजूनही...फरक इतकाच – तो आतून बाहेरून प्रकाशमान झालाय अन आपण फक्त आभासी
उजेडात जगतोय..
दिवस गेले, वर्ष सरली...जगण्याची ही विहीर
पुन्हा काठोकाठ भरली; आज इतक्या दिवसांनंतर या पाण्यावर पुन्हा तवंग आलाय...इथली वांझोटी
जळमटं पाचोळ्यागत तरंगतायत, चमकतायत बाहेरच्या उजेडात. पण आतल्या अंधाराचं काय? तिथे
कोणीच पोहोचायला तयार नाहीय. कित्ती दिवस झालेत, मनाला मनासारखं, मनापासून असं
दिलंच नाही काही. आज या मित्राची आठवण झाली म्हणून त्याच्यासारखाच थोडा उजेड घेवून
मनाच्या तळाशी उतरेन म्हणतो..तंत्रज्ञानाच्या या आभासी दुनियेतून थोडं दूर फक्त
स्वतःच्याच अरण्यात जावून फक्त स्वतःलाच एक घट्ट मिठी मरीन म्हणतो...काय होतंय
बघू..आज नो कॉल्स, नो मेसेजस, नो व्हाटसअप नथिंग मोअर...
रात्री घरासमोरच्या अंगणात निपचित निजावं
आकाशातलं चांदणं मोजत, तितकाच हा मोह होतो अगदी आतल्या आत काहीतरी शोधण्याचा...दुर्दैवानं
राग, लोभ, द्वेष, मत्सर, हेवे–दावे सारं खच्चून भरलंय मनात. एकमेकांचे सूड उगवत
जाळपोळ करतोय आम्ही, जणू काही एकमेकांना संपवायलाच जन्माला आलो आपण. असं चित्र
निर्माण झालं, माणसांच्या दुनियेत माणुसकी नामशेष होत चाललीय आणि तरीही आम्ही साजरं
करतोय हे सगळं वरवरचं प्रकाशमय दिसणं.
वर नमूद केलेली कथा काल्पनिक असली तरीही त्यातला
आशय मला पोहोचवणं गरजेचं वाटतं. दीपावली दरवर्षी साजरी होतेय, होत राहिल परंतु आपण या प्रकाशमान
करणाऱ्या सणाचा खरंच तितक्या वैचारिक अर्थाने बोध घेतो का? हा मला पडलेला प्रश्न
आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आठवते - सूर्य अस्ताला जातो आहे आणि तो जाताना
प्रश्न विचारतो की, माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल? तेव्हा
तारे हिरमुसतात, ते बोलतात–आम्ही तर
स्वयंप्रकाशी, स्वतः पुरतंच
जगणारे, आम्हाला कसं शक्य आहे? चंद्रही ढगाआड लपून नाहीसा होतो, ग्रहांचाही नकार
मिळतो. शेवटी एका झोपडीत मिणमिणत असलेला एक दिवा समोर येतो आणि हात जोडून सूर्याला
म्हणतो – हे पित्या , माझं अस्तित्व तरी कितीसं ! तुज्या इतका प्रकाश मी जागाला नाही देवू शकत, पण एक मात्र
नक्की करेन, माझ्या हृदयात तेल असेपर्यंत
प्रत्येक झोपडीचा कोनाडा मी प्रकाशमान ठेवीन !
अगदी हीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. उजेड
म्हणजे तरी काय शेवटी? एकमेकांना आपलंसं करणं, एकमेकांना आधार देणं, एकमेकांना घास
भरवणं. पण एक खेदाची गोष्ट वाटते ती म्हणजे आमचा प्रसवास एकमेकांचे घास
ओरबडण्याकडे सुरु झाला. या कवितेतल्या दिव्यासारखीच काही चांगली माणसं फार दुर्मिळ
उरली समाजात आणि त्यावरच हे जग जगत आहे असं म्हणावं लागेल. कारण याउलट असलेल्या
जास्त लोकांची अवस्था अगदी चंद्र तार्यासारखी आहे, ते खूप आनंदात आहेत पण तो आनंद फक्त
आपल्यापुरताच. ना ते कोणाला वाटू शकत ना ते कोणाच्या दुःखाचा वाटा घेवू शकत.याचं दुसरं
कारण म्हणजे आमच्या मनाची कवाडं कुजून, गंजून गेली पण आम्ही कोणासाठी ती उघडली
नाही. इतकच नाही तर आम्ही आम्हाला काही मिळावं म्हणूनही कधी ती खुली केली नाहीत. वास्तवात
एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र येण्याएवजी दूर गेलो आणि अवास्तव मागण्यांसाठी
मोर्चे, आंदोलने घेवून एकत्र उभे राहिलो आणि म्हणूच जग ग्लोबल होत असताना माणूस
एकाकी होत चालला आहे...यापेक्षा घणघोर अंधार दुसरा कोणता असेल आमच्या जीवनात?
तुमचं तुम्ही ठरवा. मी मात्र ठरवलंय आज, मनाच्या
तळाशी एक तरी पणती तेवत ठेवायची....माझा कोनाडा उजळण्यासाठी !
- कृष्णा बेलगांवकर

No comments:
Post a Comment